‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’चा चौथा सिझन; ही प्रसिद्ध अभिनेत्री करणार सूत्रसंचालन

मी होणार सुपरस्टार- छोटे उस्तादचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री या सिझनचं सूत्रसंचालन करणार आहे. नवीन वर्षात 3 जानेवारीपासून हा शो सुरू होणार आहे.

मी होणार सुपरस्टार- छोटे उस्तादचा चौथा सिझन; ही प्रसिद्ध अभिनेत्री करणार सूत्रसंचालन
'मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद'चा चौथा सिझन
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 10, 2025 | 4:15 PM

‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’च्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचं भरभरुन मिळालं. या तिन्ही पर्वातले स्पर्धक आपल्या प्रतिभेनं महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. मालिकेचं शीर्षकगीत असो वा चित्रपटातलं गाणं प्रत्येक स्पर्धकाला स्टार प्रवाहच्या माध्यमातून आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. ‘मी होणार सुपरस्टार’चा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. स्पर्धकांवर सुरांचे संस्कार करण्यासाठी ‘मी होणार सुपरस्टार’चा चौथा सिझन सज्ज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत.

नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे. साजिरी नुकतीच एका चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. हाच गोडवा घेऊन ती छोट्या उस्तादांसोबत धमाल करणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद 4’च्या निमित्ताने साजिरीची टेलिव्हिजन विश्वात एण्ट्री होतेय.

याविषयी सांगताना साजिरी म्हणाली, “नवीन माध्यम जाणून घेण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’ हा कमाल शो आहे. याआधीची तिन्ही पर्व सुपरहिट ठरली आहेत. चौथं पर्व मला सूत्रसंचालन करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सगळेच स्पर्धक कमाल आहेत. त्यांची गाणी ऐकण्यासाठी, त्यांचं स्वप्न जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. सचिन पिळगावकर सर, आदर्श शिंदे दादा, वैशाली सामंत ताई इतके दिग्गज समोर असताना मलाही खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सुरांची स्वप्ननगरी अशी या पर्वाची थीम असणार आहे. स्वप्न सगळ्यांसाठीच महत्त्वाची असतात. जादू अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं. त्य़ामुळे या जादुई नगरीची सफर करण्याची एक वेगळी ओढ लागलीय.”

‘मी होणार सुपरस्टार’चा चौथा सिझन नवीन वर्षात 3 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.