5 दिवसांत 2000 कोटींची कमाई, जगभरातील सर्वांत मोठा बायोपिक; भाच्यानेच साकारली भूमिका

नुकताच प्रदर्शित झालेला हा बायोपिक जगभरात छप्परफाड कमाई करतोय. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या आकड्यावरूनच तुम्हाला चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. हा जगभरातील सर्वांत चर्चेतला बायोपिक ठरत आहे.

5 दिवसांत 2000 कोटींची कमाई, जगभरातील सर्वांत मोठा बायोपिक; भाच्यानेच साकारली भूमिका
जगभरातील सर्वांत मोठा बायोपिक
Image Credit source: Youtube
| Updated on: Apr 28, 2026 | 10:35 AM

जगातील सर्वांत मोठा बायोपिक, पाच दिवस आणि कमाई 2000 कोटी रुपये पार.. एकीकडे रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने दीड दीड महिन्यात 1800 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसरीकडे या बायोपिकने फक्त पाच दिवसांत छप्परफाड कमाई करून सर्वांनाच थक्क केलं आहे. विशेष म्हणजे समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही प्रेक्षक त्याला पसंत करत आहेत. याचा अंदाज बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून स्पष्ट जाणवत आहे. फक्त परदेशात नाही, तर भारतातही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. हा बायोपिक आहे जगविख्यात पॉप स्टार मायकल जॅक्सनचा. या चित्रपटाने ‘ओपनहायमर’ आणि ‘बोहेमियन रॅप्सडी’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

‘मायकल’ हा चित्रपट 22 एप्रिल रोजी युकेसह परदेशात आणि 24 एप्रिल रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आणि त्यानंतर पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने बंपर कमाई करत इतिहास रचला आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात या चित्रपटाने 217 मिलियन डॉलर म्हणजेच 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. त्यातही फक्त उत्तर अमेरिकेतच या चित्रपटाचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन 97 मिलियन डॉलर म्हणजेच 899 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला होता. याआधी नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक ‘ओपनहायमर’ होता. या चित्रपटाने 2023 मध्ये 82 मिलियन डॉलरची कमाई केली होती. तर त्याआधी 2018 मध्ये ‘बोहेमियन रॅप्सडी’ या बायोपिकने 51 मिलियन डॉलर कमावले होते.

फक्त परदेशातच नाही तर भारतातही ‘मायकल’ हा चित्रपट चांगली कमाई करतोय. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत 16.72 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 20 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. ‘मायकल’ या बायोपिकमध्ये ज्या व्यक्तीने मायकल जॅक्सनची भूमिका साकारली आहे, तो खऱ्या आयुष्यात त्याचा भाचा जाफर जॅक्सनच आहे. जाफरने साकारलेल्या या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक होत आहे. हा जगभरातील नंबर वन बायोपिक बनला आहे. ‘मायकल’ने ‘धुरंधर 2’सह अनेक मोठ्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील खेळ खल्लास केला आहे.

मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटावरून प्रदर्शनापूर्वी बराच मोठा वाद झाला होता. तब्बल 1666 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची ओपनिंग मात्र तेवढीच जबरदस्त झाली. त्यामुळे ‘मायकल’ या चित्रपटाचं वादळ ‘धुरंधर 2’च्या वर्ल्डवाइड कमाईला ब्रेक लावू शकतो. सोबतच ‘दंगल’चा लाइफटाइम ग्लोबल कलेक्शन रेकॉर्ड मोडण्याचं रणवीरच्या चित्रपटाचं स्वप्न अपूर्णच राहू शकतं.

Follow Us