‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’मध्ये भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटे महत्त्वपूर्ण भूमिकेसह क्रिएटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारीही सांभाळणार आहे. सामाजिक प्रश्न आणि विनोदाचा मेळ असलेला हा चित्रपट चर्चेत आला आहे.

मिसेस मुख्यमंत्री किडनॅपमध्ये भाग्यश्री मोटे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
भाग्यश्री मोटेचा नवा चित्रपट
| Updated on: Nov 27, 2026 | 4:55 PM

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच आता एका आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ असं या आगामी मराठी चित्रपटाचं नाव असून, पहिल्या पोस्टरमधून निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, विशेष म्हणजे त्या या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारीही सांभाळणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

‘अबीर’नंतर नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी यापूर्वी ‘अबीर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता या दोन्ही संस्थांचा ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ हा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पहिल्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं नावच इतकं वेगळं आणि लक्षवेधी आहे की, नेमकं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं अपहरण का होतं, त्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे आणि या कथेतून कोणता विषय मांडला जाणार आहे, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुदेश वसंतराव झावरे पाटील आणि अंकिता पानसे-शिंदे करत आहेत. पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर आकाश विष्णू शिंदे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत.

Loading...

भाग्यश्री मोटेची दुहेरी जबाबदारी

या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मोटे. ती केवळ अभिनय करताना दिसणार नाही, तर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. मराठी चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही भाग्यश्रीने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अभिनयासोबतच निर्मिती प्रक्रियेतील सर्जनशील जबाबदारी स्वीकारत ती नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिच्या या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून त्यातून सामाजिक आशयही मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रासमोरील ज्वलंत प्रश्न, त्यातून निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील वास्तव यांचा वेध चित्रपट घेणार आहे. मात्र, हे विषय मांडताना विनोदाची खुमासदार फोडणी देण्यात येणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सामाजिक भाष्य आणि मनोरंजन यांचा मेळ या चित्रपटात पाहायला मिळू शकतो. गीत-संगीताचीही सुरेल जोड चित्रपटाला लाभणार आहे.

भाग्यश्री मोटे हिच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी कोणते कलाकार झळकणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. लवकरच कलाकारांची फळी, कथानक आणि इतर तपशील जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ या वेगळ्या शीर्षकाच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us