Mugdha Shah : स्मशानघाटसारखं वातावरण, काऊंटरवर मृतदेह…मराठी अभिनेत्रीनं सांगितला करोनाचा धक्कादायक अनुभव
Mugdha Shah On Corona : मुग्धा शाह यांनी नुकत्याच एका मुलाखतीत करोनाचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

करोनाच्या काळात अनेकांना वेगवेगळ्या कटू अनुभवांना सामोरं जावं लागलं. काहींना या आजाराचा तीव्र त्रास झाला, तर काहींना कोणतीही लक्षणं नसतानाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. अभिनेत्री मुग्धा शाह यांनीही करोनाच्या काळातील असाच एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. करोनाची कोणतीही लक्षणं नसताना त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी तिथून थेट घरी जाण्याचा निर्णय घेतला.
मुग्धा शाह यांनी सांगितलं की, करोनाच्या काळात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. श्वास घेण्यास त्रास नव्हता किंवा इतर कोणतीही लक्षणं जाणवत नव्हती. मात्र, त्यावेळी सर्वजण करोनाची चाचणी करत असल्यामुळे त्यांनाही टेस्ट करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा आणि जावई या दोघांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं.
मुग्धा शाह यांनी सांगितला प्रसंग
मुग्धा शाह म्हणाल्या की, ‘करोनामध्ये मला कसलाही त्रास होत नव्हता. ना श्वासाचा ना कसलाच. पण, सगळे कोव्हिडची टेस्ट करत होते. त्यामुळे मलाही टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आलं. माझ्या जावयाला आणि मुलाला करोना झालेला. दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये होते. मीसुद्धा कोव्हिडची तपासणी केली.’
‘मला त्यांनी विचारलं, दीदी तुम्हाला काही त्रास होत नाहीये? तुमचा रिपोर्ट चांगला नाहीये. त्यांनी मला ऍडमिट होण्यास सांगितलं. त्यांनी मग मला वशिला लावून बीकेसीला पाठवलं. तिथे गेल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. स्मशानघाटसारखं सगळं होतं. काउंटरवर मृतदेह होते. दोन–अडीच तासांनी माझा नंबर आला. मी दिलेली फाईल परत घेतली आणि माझ्या मागच्या माणसाला सांगितलं तुम्ही जा. तिथून रिक्षा केली आणि घरी आले. मी म्हटलं, मला तसं मारायचंच नाहीये.’ असं मुग्धा शाह यांनी शेवटी सांगितलं. ‘सोनचाफा प्रोडक्शन‘ला दिलेल्या मुलाखतीत मुग्धा शाह बोलत होत्या.