नवरा गेला अन् सिनेमे करू लागली..; टोमणे मारणाऱ्यांना नीतू कपूर यांचं सडेतोड उत्तर
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर जेव्हा कामावर परतल्या आणि चित्रपटांसाठी शूटिंग करू लागल्या, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टोमण्यांवर आणि टीकेवर नीतू कपूर यांनी आता उत्तर दिलं आहे.

कोविड महामारीच्या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीला सर्वांत मोठा धक्का अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बसला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं जाणं हे कपूर घराण्यासाठी कधीच भरून न निघणारं दु:ख आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाने त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर आणि मुलगी रिद्धिमा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण वेळेनुसार हळूहळू त्यातून ते सावरत गेले आणि आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले. ऋषी कपूर यांच्या आठवणी कायम मनात ठेवून नीतू कपूरसुद्धा त्यांचं दैनंदिन आयुष्य जगू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा काहींनी त्यांच्यावर लगेच टीका करण्यास सुरुवात केली होती.
नवरा गेला आणि ती कामावर परतली, सिनेमे करू लागली.. असे टोमणे नेटकऱ्यांनी मारण्यास सुरुवात केली होती. यावर नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काम करण्याचा निर्णय का घेतला, यामागचं कारण त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये त्या म्हणाल्या, “माझा थेरपीवर विश्वास नाही. मला असं वाटतं की, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वत:लाच प्रयत्न करावे लागतात. कोणीच तुम्हाला काय करावं हे सांगू शकत नाही.”
“ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर मी काम करायला सुरुवात केली. मी जुग जुग जियो या चित्रपटात भूमिका साकारली, इंडियन आयडॉलमध्ये पाहुणी म्हणून गेली, वेगवेगळी कामं केली.. जेणेकरून माझ्यातील आत्मविश्वास मी परत आणू शकेन. मी अत्यंत वाईट काळातून जात होती. पण जेव्हा लोकांनी टीका केली की नवरा गेलाय आणि ही अभिनय करू लागली.. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी काम का सुरू केलं, हे त्यांना माहीतच नाही. मला त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागला. तेव्हा माझ्या आजूबाजूच्या, जवळच्या लोकांनी मला पुन्हा काम करण्यासाठी प्रेरणा दिली”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नीतू कपूर लवकरच ‘दादी की शादी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगीसुद्धा झळकणार आहे. रिद्धिमा कपूर या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याचसोबत कपिल शर्मा, आर. सरथ कुमार, योगराज सिंह यांच्याही भूमिका आहेत.