
उल्लू अॅपवरील ‘हाऊस अरेस्ट’ हा रिअॅलिटी शो त्यावरील वादग्रस्त कंटेंटमुळे बंद करण्यात आला होता. या शोमध्ये मर्यादेपेक्षा जास्त अश्लीलता दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. या शोमध्ये अडल्ट अभिनेत्री नेहल वडोलियाने वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. परंतु या शोमध्ये तिला जे दृश्य दिसलं, ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. याविषयीचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहल शोविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नेहलने सांगितलं की, “शोमध्ये पुढे इंटीमसीपर्यंत बऱ्याच गोष्टी दाखवल्या जाणार होत्या. त्यामुळे हा शो बंद झाला ते एका अर्थी चांगलंच झालं.”
याविषयी ती पुढे म्हणाली, “तो शो बंद झाला, ते योग्यच झालं. जर तो शो बंद झाला नसला तर पुढे जितके एपिसोड्स शूट झाले होते आणि त्यात मी जे पाहिलं होतं ते आणखी खराब होतं. मी वाइल्ड कार्ड एण्ट्री म्हणून त्या शोमध्ये गेली होती. त्यादरम्यान मी जे सीन्स शूट होताना पाहिले, ते सर्व उघड झालं असतं तर आणखी काय काय बंद करावं लागलं असतं माहीत नाही.” हे ऐकल्यानंतर शोमध्ये कोणत्या प्रकारचे सीन्स आणि टास्क तू पाहिलेस, असा प्रश्न नेहलला विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं की, आतापर्यंत तुम्ही जे काही पाहिलं, ते फक्त दहा टक्केच होतं. पुढे शोमध्ये आणखी अश्लील भाषा आणि अश्लील सीन्स होते.
“एखाद्या टास्कदरम्यान काही केलं तर समजलं जाऊ शकतं, पण काहीच विषय नसताना जर तुम्ही जाऊन एखाद्याला किस करत असाल, तर नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? खऱ्या आयुष्यात तुम्ही असं कोणालाही जाऊन किस करता का? तिथे चादर ओढून काहीही केलं जात होतं. मी तर फक्त किसिंगबद्दल बोलतेय. तिथे असं काहीच नव्हतं जे घडत नव्हतं. कोणीही कोणासोबतही लिपलॉक करत होतं”, असा सवाल नेहलने केला.
नेहलने पुढे सांगितलं की या शोमध्ये जाण्यापूर्वी तिने एक स्पष्ट करार साइन केला होता. कोणत्याही टास्कशिवाय मी काहीच करणार नाही, असा तिचा करार होता. “मी कोणाला स्पर्श करणार नाही, कोणाला करुही देणार नाही. मी विनाकारण शिवीगाळ करणार नाही, हे सर्व मी आधीच स्पष्ट केलं होतं”, असं नेहलने सांगितलं.