काम करणारी लोकं भिकारी नाहीत, यापुढे नावांसकट यादी टाकेन..; निळू फुले यांच्या कन्या कोणावर भडकल्या?

निळू फुले यांच्या कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी कलाकारांच्या पैसे थकवण्याबाबत सोशल मीडियावर रोखठोक पोस्ट लिहिली आहे. पुढच्या वेळी नावांसह यादी टाकेन, असा इशाराच त्यांनी या पोस्टद्वारे दिला आहे.

काम करणारी लोकं भिकारी नाहीत, यापुढे नावांसकट यादी टाकेन..; निळू फुले यांच्या कन्या कोणावर भडकल्या?
Gargi Phule
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2026 | 3:14 PM

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार दिवस-रात्र राबतात आणि अनेकदा त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसेसुद्धा वेळेवर मिळत नाही. याआधी अनेक कलाकारांनी याप्रकरणी आवाज उठवला आहे. अशातच दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले यांच्या फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. गार्गी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याचसंदर्भात एक पोस्ट लिहिली असून पुढच्या वेळी नावांसह यादीच टाकेन, अशा इशारा दिला आहे. जगाला उपदेश देत फिरण्यापेक्षा आधी लोकांनी केलेल्या कामांचे पैसे त्यांना द्यावेत, असंही त्यांनी म्हटलंय. यावळी गार्दी फुले यांनी असंही स्पष्ट केलंय की त्यांचे कुठलेही पैसे बुडाले नाहीत, पण त्यांच्या प्रियजनांबाबत हे घडलंय.

गार्गी फुलेंची पोस्ट-

‘जगाला उपदेश देत जे फिरत असतात की धंदा कसा करावा, फिल्ममध्ये कसा पैसा आहे.. पैसा नाही आणि काय केलं की फिल्म चालू शकेल, विशेषत: मराठी.. त्यांनी आधी केलेल्या कामांचे पैसे द्यावेत लोकांना. काम करणारी लोकं भिकारी नाहीत. मेहनत करतात आणि त्याचा मोबदला असतो जो आधीच ठरलेला असतो. ही आता नुसती पोस्ट टाकते आहे, यापुढे नावांसकट लिस्ट टाकेन’, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. या पोस्टमध्ये गार्गी यांनी पुढे असंही स्पष्ट केलं आहे की, ‘ता. क. माझे कुठलेही पैसे बुडाले नाहीत. पण माझ्या प्रियजनांचे अजून दिले नाहीत. तेव्हा कृपया मला फोन करून विचारू नये काय झालं म्हणून.’

याआधी अभिनेता शशांक केतकरनेही सोशल मीडियाद्वारे थकलेल्या मानधनाबद्दल आवाज उठवला होता. दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचं थेट नाव घेऊन त्याने सर्व गोष्टींचा खुलासा केला होता. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका संपल्यानंतर बराच अवधी लोटूनही त्यांनी पैसे दिले नसल्याची तक्रार शशांकने केली होती. त्यानंतर मंदार देवस्थळी यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांची हीच तक्रार असून काहीजण त्यावर मोकळेपणे बोलणं टाळतात. तर काहीजण त्यावर आवाज उठवून समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधतात. आता गार्गी फुले यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us