सलमान खानचा सर्वाधिक विकला गेलेला अल्बम, 7 दशलक्षांहून अधिक कॉपी.. ऐकतच राहावीशी वाटते 9 गाण्यांची प्ले-लिस्ट
Salman Khan: सलमान खानच्या या चित्रपटातील गाण्यांच्या अल्बमचे 7 मिलियन कॉपी विकले गेले होते. कुमार सानू, एसपी बालसुब्रमण्यम, अल्का याज्ञिक यांच्या आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली होती.

नव्वदच्या दशकात सलमान खानने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांमधील गाणी आजसुद्धा चाहते त्यांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट करतात. परंतु तुम्हाला ‘भाईजान’च्या अशा एका चित्रपटाबद्दल माहित आहे का, ज्यामधील नऊची नऊ गाणी इतकी हिट झाली की आतापर्यंतच्या 100 सर्वोत्तम बॉलिवूड गाण्यांच्या यादीत ते 16 व्या क्रमांकावर आहेत. नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गायक कुमार सानू, अल्का याग्निक, अनुराधा पौडवाल आणि एसपी बालसुब्रमण्यम यांनी आपल्या सुमधूर आवाजात ही गाणी रेकॉर्ड केली होती. सलमानच्या चित्रपटातील ही गाणी सदाबहार आहेत.
ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलत आहोत, त्या चित्रपटाचं नाव ‘साजन’ असं आहे. यामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘साजन’मध्ये एकूण नऊ गाणी होती आणि ही सर्व गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
‘साजन’ चित्रपटातील गाणी-
- मेरा दिल भी कितना पागल है (कुमार सानू आणि अलका याग्निक)
- बहुत प्यार करते हैं (एस. पी. बालसुब्रमण्यम)
- देखा है पहली बार (दरबारी) (एस. पी. बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक)
- जीये तो जीयें कैसे (कुमार सानू, एस. पी. बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल)
- बहुत प्यार करते हैं अनुराधा पौडवाल)
- तुमसे मिलने की तमन्ना है (एस. पी. बालसुब्रमण्यम)
- तू शायर है मैं तेरी शायरी (अलका याग्निक)
- जीये तो जीयें कैसे (पंकज उदास)
- पहली बार मिले हैं (एस. पी. बालसुब्रमण्यम)
नदीम श्रवण यांनी ही गाणी संगीतबद्ध केली होती, तर समीर आणि फैज अन्वर यांनी ही गाणी लिहिली होती. या चित्रपटाचा अल्बम हा त्या वर्षातील सर्वाधिक विकला गेलेला अल्बम होता. त्याच्या सात लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. प्लॅनेट बॉलिवूडन ‘ऑलटाइम 100 सर्वोत्तम बॉलिवूड साऊंडट्रॅक्स’च्या यादीत ‘साजन’च्या अल्बमला 16 वं स्थान दिलं आहे.
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लॉरेन्स डिसूझा यांनी केलं होतं. तर सुधाकर बोकडे याचे निर्माते होते. हा चित्रपट ‘अपन अमर अपन’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर कादर खान, रीमा लागू आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाने त्यावेळी 18.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.