भयंकर अपघातानंतर नोरा फतेहीची पहिली प्रतिक्रिया; एका क्षणात संपूर्ण आयुष्य..

मुंबईत डीजे डेव्हिड गुएट्टाच्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी जाताना अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा भीषण अपघात झाला. एका मद्यपीच्या कारने नोराच्या कारला जोरात धडक दिली होती. यामुळे तिचं डोकं कारच्या खिडकीवर आदळलं गेलं होतं.

भयंकर अपघातानंतर नोरा फतेहीची पहिली प्रतिक्रिया; एका क्षणात संपूर्ण आयुष्य..
अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा अपघात
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2025 | 11:21 AM

अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात झाला. या अपघातात किरकोळ दुखापत झाल्यानंतर काही तासांतच तिने मुंबईतील डीजे डेव्हिड गुएटासोबत स्टेजवर हजेरी लावली. आता या अपघातावर तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा आयुष्यातील सर्वांत भयंकर आणि तणावपूर्ण क्षणांपैकी एक असल्याचं तिने म्हटलंय. नोरा फतेहीच्या कारला एका मद्यपी चालकाच्या गाडीची जोरात धडक लागलीहोती. या धडकेदरम्यान तिचं डोकं कारच्या खिडकीवर आदळलं होतं. यामुळे तिला किरकोळ दुखापत झाली असून सध्या ठीक असल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे या धक्कादायक अपघातानंतरही नोराने स्टेजवर परफॉर्म केलं.

नोराची पहिली प्रतिक्रिया

‘मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी सध्या ठीक आहे. दुपारी माझ्या कारचा गंभीर अपघात झाला होता. मद्यपान केलेल्या एका व्यक्तीची कार माझ्या गाडीला जोरात धडकली होती. ही धडक इतकी जोरदार होती की मी माझ्या गाडीच्या दरवाजावर आदळली गेली. माझं डोकं खिडकीवर जोरात आदळलं. मी जिवंत आहे आणि आता बरी आहे. काही किरकोळ दुखापती आणि सूज आहे. अजूनही मी त्या धक्क्यातच आहे. पण ठीक आहे. या अपघातात काहीतरी भयानक घडू शकलं असतं. त्यामुळे तुम्ही दारू पिऊन कधीच गाडी चालवू नका. मला सुरुवातीपासूनच दारूचा तिरस्कार आहे’, असं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे.

‘दारू, ड्रग्ज, गांजा किंवा एखाद्या व्यक्तीची मनस्थिती, सतर्कता बदलणारी कोणतीही गोष्ट मला कधीच आवडली नाही. या गोष्टींना मी कधीच प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांच्या आजूबाजूला राहणंदेखील मला आवडत नाही. मद्यपान करून कधीच गाडी चालवू नका. हे 2025 आहे आणि अजूनही आपण याविषयी बोलतोय यावर मला विश्वासच बसत नाहीये. भरदुपारी 3 वाजता अशी एखादी घटना घडावी यावरही मला विश्वास बसत नाहीये. एखाद्याने मद्यपान करून गाडी चालवावी आणि स्वत:चा, दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालावा, याची मी कल्पनाच करू शकत नाही. मी तुम्हाला कळवू इच्छिते की मी ठीक आहे. काही काळ वेदना जाणवतील, पण देवाच्या कृपेने मी जिवंत आहे’, अशा शब्दांत नोरा व्यक्त झाली.

या अपघातानंतरही नोराने परफॉर्म केलं. कामात मी कोणत्याही गोष्टीचा अडथळा येऊ देणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘मी खोटं बोलणार नाही, पण ही घटना अत्यंत भीतीदायक, भयंकर आणि ट्रॉमा देणारी होती. मी अजूनही त्याच धक्क्यात आहे. मी माझ्या कामात, माझ्या महत्त्वाकांक्षेत आणि मला मिळणाऱ्या कोणत्याही संधींमध्ये कसलाच अडथळा येऊ देत नाही. इथवर पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे’, असं सांगताना तिने दारू पिऊन गाडी चालवू नका, असं आवाहन पुन्हा एकदा केलं.

‘दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावल्याच्या असंख्य घटना मुंबई आणि भारतात घडल्या आहेत. मी ठीक आणि सुरक्षित असल्याबद्दल कृतज्ञ आहे. पण त्या क्षणांमध्ये मी माझं अख्खं आयुष्य जणू फ्लॅशबॅकमध्ये पाहिलं होतं. असा अनुभव कोणालाच येऊ नये अशी माझी इच्छा आहे’, अशा शब्दांत नोरा व्यक्त झाली.