11 एपिसोड्सच्या सीरिजला 8.5 रेटिंग; सस्पेन्स थ्रिलरच्या प्रत्येक वळणावर सरप्राइज
अकरा एपिसोड्स, महाभारतातील डावपेचांवरून प्रेरणा, दमदार कथानक.. ही वेब सीरिज 2021 मध्ये प्रदर्शित झाली होती, मात्र आता ही ओटीटीवर पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. या सीरिजची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.

क्राइम-थ्रिलर म्हणताच चोर-पोलीस यांसारखे शब्द कानात घुमू लागतात. अंधाधुंद गोळबार, रक्तपात, मारहाण यांसारखे चित्र डोळ्यांसमोर येतात. मात्र 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरिजने या जुनाट फॉर्म्युल्याला पूर्णपणे बदललं होतं. अजय भुईया दिग्दर्शित या 11 एपिसोड्सची सीरिज मानसिक खेळ, उत्कंठा आमि वेष बदलण्याच्या विलक्षण कलेवर आधारित होती. या सीरिजची कथा एका अशा थरारक मानसिक खेळाची आहे, जिथे शस्त्रापेक्षाही चलाख बुद्धी अधिक महत्त्वाची ठरते.
वेब सीरिजची कथा
या वेब सीरिजची कथा मत्स्य थडाभोवती (रवी दुबे) फिरते, जो त्याच्या चातुर्याच्या जोरावर देशातील सर्वांत धूर्त चोर बनतो. त्याच्या कुटुंबावर झालेल्या भयंकर अन्यायाचा सूड घेण्याच्या तीव्र इच्छेने तो पेटलेला आहे. तुरुंगात गेल्यावर त्याच्या आयुष्याचा कलाटणी मिळते. तिथे त्याची भेट आनंद पंडित (पियुष मिश्रा) यांच्याशी होते. ते त्याचे गुरू बनतात. आनंद त्याला शस्त्रे न उचलता महाभारतातील राजनैतिक तत्त्वांचा सर्वांत शक्तिशाली शस्त्र म्हणून वापर करायला शिकवतात. तुरुंगातून सुटल्यानंतर मत्स्य देशातील उच्चभ्रू लोकांना आणि भ्रष्ट व्यवस्थेला आपल्या हाताशी धरून खेळ खेळू लागतो. अशातच कथेत एसीपी तेजराज सिंगची (रवी किशन) एण्ट्री होते. तेजराज हा काही साधासुधा पोलीस नाही, तर गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याच्यामध्ये स्वत: गुन्हेगारासारखा विचार करण्याची क्षमता आहे. यानंतर मत्स्य आणि तेजराज यांच्यात अत्यंत उत्कंठावर्धक आणि नाट्यमय खेळ सुरू होतो.
अकरा एपिसोड्स
या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या सर्व अकरा एपिसोड्सची नावं ही महाभारतातील पात्रे किंवा घटनांवरून ठेवण्यात आली आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास.. अभिमन्यू, भस्मासूर, मोहिनी अवतार इत्यादी. याचं कथानकसुद्धा महाभारतातील डावपेचांपासून प्रेरित आहे. या सीरिजमध्ये रवी दुबेनं जवळपास 11 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रोस्थेटिक मेकअपमुळे त्याला ओळखणंही कठीण होतं.
‘मत्स्य कांड’ या वेब सीरिजचं शूटिंग जयपूर, मेरठ आणि दिल्ली याठिकाणी झाली आहे. या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 8.5 रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज तुम्ही एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.