58 वर्षांपूर्वीच्या या गाण्यामुळे शेजारच्या खिडक्या झाल्या बंद , किशोर कुमारांनी रंगवलं गाणं, हिरोचं फक्त लिप-सिंक
जवळपास ५८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पडोसन' चित्रपटाने आजही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'मेरे सामने वाली खिडकी में' हे गाणे सुनील दत्त आणि किशोर कुमार यांच्या जबरदस्त जुगलबंदीमुळे अजरामर झालं.

हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 58 वर्षांपूर्वी आलेला एक असा चित्रपट होता, ज्यात हिरो हिरॉईनचं मन जिंकून घेण्यासाठी बॉलिवूड स्टाइल प्लेबॅक सिंगिंगच्या फॉर्म्युलाचा वापर करतो. म्हणजे तो फक्त तोंड हलवतो पण त्या गाण्याला आवाज देतो, तो मागे बसलेला त्याचा गायक मित्र. आत्तापर्यंत अनेकांनी हा चित्रपट ओळखला असेल. हो, हो तोच चित्रपट आहे – पडोसन. सुनील दत्त आणि किशोर कुमार या दोघांची जबरदस्त जुगलबंदी असलेला हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. त्या या दोघांनी अशी धमाल केली की आजूबाजूच्यांच्या खिडक्या बहुतांश बंदच राहू लागल्या आणि हेच गाणं घराघरांत ऐकू येऊ लागलं. त्या गाण्याचं नाव म्हणजे – ‘मेरे सामने वाली खिड़की मे’
किशोर कुमारचा सुरेल आवाज आणि आर.डी. बर्मन यांच्या सुमधुर संगीताला राजेंद्र कृष्ण यांनी लिहीलेल्या बोलांची अशी साथ मिळाली ती आजही कोणी ‘मेरे सामने वाली खिड़की में’ हे गाणं ऐकलं तर चेहऱ्यावर आपोआप हसू उमलतं. खिडकीसमोर उभं राहून सुनील दत्त लीप सिंक करतात आणि बॅकग्राऊंडमध्ये किशोर कुमार त्यांच्या आवाजात हे गाणं म्हणतात. ते ऐकून सायरा बानू यांच्या चेहऱ्यावरही हसू फुलतं. इतक्या वर्षांनतंरही आज हा सीन तेवढाच फ्रेश वाटतो.
गाण्याची खासियत आणि किशोर कुमार यांची कमाल
‘मेरे सामने वाली खिड़की में’ हे पडोसन चित्रपटातील केवळ लोकप्रिय गाणं नाही, तर चित्रपटाचं कथानकदेखील त्यासोबत पुढे जातं, त्यामुळे गाणं खूप हत्वाचं ठरतं. गाणं- संगीत यांचं फारसं ज्ञान नसलेला भोला (सुनील दत्त) हा त्याच्याच शेजारी राहणाऱ्या बिंदूला (सायरा बानू) प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो त्याच्या गुरुची (किशोर कुमार) मदत घेतो. ते गाणँ गातात आणि भोला हा त्यावर लिप-सिंक करत बिंदूसमोर प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.
आर. डी. बर्मन यांच्या हलक्याफुलक्या आणि प्रसन्न संगीत संयोजनाला किशोर कुमार यांच्या खट्याळ, मिश्कील आवाजाची उत्तम साथ मळाल्याने हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि रंजक वाटतं. यासोबतच ‘एक चतुर नार’ आणि ‘कहना है’ यांसारख्या गाजलेल्या गाण्यांमुळे पडोसन चित्रपट आणि गाणी अमर झाली.
ज्योती स्वरूप यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या पडोसन चित्रपटाची निर्मिती मेहमूद आणि एन. सी. सिप्पी यांनी केली. त्यामध्ये सुनील दत्त, सायरा बानू, मेहमूद आणि किशोर कुमार यांच्यासोबत ओम प्रकाश, मुकरी आणि केष्टो मुखर्जी यांसारख्या कलाकारांनीही चित्रपटात रंगत आणली.