Satej Patil: स्विकृत संचालक फक्त 3 महिन्यांसाठी, सतेज पाटलांनी फोडला महायुतीचा प्लॅन!
सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून धमक्या देऊ नका. सरकारी यंत्रणांमधून मला धमकावण्याची भाषा करु नका, माझ्यापुढे तरी हे चालणार नाही, कोल्हापुरकरांना हे चालणार नाही, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.

Satej Patil News: अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली. आज महायुतीचे राजेंद्र पाटील हे गोकुळचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. काँग्रेस नेते सतेज पाटील यांना बहुमतानंतरही सत्तेपासून दूर रहावे लागले. या निर्णयानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी महायुतीच्या नेत्यावर जोरदार निशाणा साधला तसेच आगामी प्लॅनही सांगितला.
स्विकृत संचालक फक्त 3 महिन्यांसाठी..!
महायुतीच्या विजयानंतर बोलताना सतेज पाटील यांनी नियुक्त संचालकांबाबत एक मोठा खुलासा केला. “सरकारकडून स्विकृत संचालकांचे सहा महिन्यांचे अनुभव असलेले दाखले तयार करण्यात आले. या निर्णयावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पडलेल्या कोणालाही मी घेणार नाही, त्यामुळे तुम्ही चार नावे वेगळी द्या. मात्र यावेळी या मंडळींनी अट घातली की तीन महिन्यापुरतेच हे संचालक राहतील. तीन महिन्यानंतर यांनी राजीनामा द्यायचा अन् पुन्हा ज्यांची चर्चा होती त्यांची नियुक्ती करायची, अशी अंतर्गत माहिती आहे, असं ते म्हणालेत.
तसेच माझा न्यायालयावर विश्वास आहे, मला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. जे जे चांगल होत आहे त्याला आमचा पाठिंबा राहील. चुकीचा करायचा प्रयत्न झाला तर त्याला आमचे १३ संचालक निश्चितपणे विरोध करतील. शेतकरी हिताच्या निर्णयांना आमचा पाठिंबा असेल, असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तर!
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याचाही सतेज पाटील यांनी समाचार घेतला. माझ्यावर टीका करा, त्यांचा आणि माझा नेहमीचा सामना आहे. त्यांनी सातत्याने माझ्यावर टीका आहे. मात्र स्वर्गीय डी. वाय पाटील यांच्यावर बोलून तुम्ही काय मिळवलं? याचे त्यांनी चिंतन केले पाहिजे. आता तुम्ही धमक्या द्यायला लागलाय. तुमचा काचेचा महाल झालाय हे आम्हाला माहित आहे. मला बोलायला लावू नका, मी पण पाटील आहे. या जिल्ह्यातील 10 मतदार संघातून लढा. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून धमक्या देऊ नका. सरकारी यंत्रणांमधून मला धमकावण्याची भाषा करु नका, माझ्यापुढे तरी हे चालणार नाही, कोल्हापुरकरांना हे चालणार नाही, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.
