श्वेता तिवारीइतकी सुंदर नाहीस; टीकाकारांना पलकचं सडेतोड उत्तर

अभिनयक्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी पलक तिवारी कितीही प्रयत्न करत असली तरी अनेकदा तिची तुलना आई श्वेता तिवारीशी केली जाते. तू आईइतकी सुंदर नाहीस, तुला आईसारखा उत्तम अभिनय जमत नाही.. अशा शब्दांत नेटकरी तिच्यावर टीका करतात.

श्वेता तिवारीइतकी सुंदर नाहीस; टीकाकारांना पलकचं सडेतोड उत्तर
Palak and Shweta Tiwari
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 21, 2024 | 1:01 PM

मुंबई : 21 मार्च 2024 | अभिनेत्री श्वेता तिवारी ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची मुलगी पलक तिवारीसुद्धा इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करू पाहतेय. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. पलक तिच्या कामासोबतच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबतच्या डेटिंगच्या चर्चांमुळेही प्रकाशझोतात असते. अनेकदा पलकची तुलना तिच्या आईशी केली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलक तिच्या आईसोबतच्या तुलनेबाबत मोकळेपणे व्यक्त झाली.

‘सीएनएन न्यूज 18’च्या रायजिंग भारत समिटमध्ये बोलत असताना पलक म्हणाली, “माझ्या आईशी माझी तुलना केल्याने मला कधीच वाईट वाटलं नाही. कारण अशा गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नाही. माझ्यासाठी ती समस्या कधीच नव्हती. लोक जर मला म्हणत असतील की मी माझ्या आईइतकी सुंदर नाही, तर ठीक आहे. मला माहीत आहे. किंबहुना माझ्या आईपेक्षा सुंदर कोणीच नाही असं मला वाटतं. मी माझ्या आईची सर्वांत मोठी चाहती आहे. मी माझ्या आईइतकी चांगली अभिनेत्री नाही, असंही काहीजण म्हणतात. पण मला आता फक्त इंडस्ट्रीत दोनच वर्षे झाली आहेत. मला थोडा वेळ तरी द्या. पण सध्या जे काही सुरू आहे, ते काही वाईट नाही.”

आईविषयी पलक पुढे म्हणाली, “मला याचा आनंद आहे की मला माझ्या आईकडून बरंच काही शिकायला मिळतं. मी फक्त अभिनयाबद्दल बोलत नाहीये. तर खऱ्या आयुष्यातही ती अत्यंत चांगली व्यक्ती आहे. एक महिला कशी असावी, हे मला त्यांच्याकडून शिकायचं आहे.” पलकची आई श्वेता तिवारी ही टीव्ही इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’, ‘बेगुसराय’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

पलक तिवारीने गेल्या वर्षी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्याआधी ती ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आली होती. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधीपासूनच पलकचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलंय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. याआधी सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत पलक फिरायलाही गेली होती.