कंपनीच्या मालकाचा दिलदारपणा, इमानदारीसाठी कर्मचाऱ्यांना दिला 2100 कोटींचा बोनस
Graham Walker : अमेरिकेतील लुईझियाना येथील एका व्यावसायिकाने केलेले कार्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. यामुळे ग्रॅहम वॉकर या व्यक्तीला "रिअल लाईफ सांता" ही पदवी मिळाली आहे.

संपूर्ण जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गिफ्ट दिले. अशातच अमेरिकेतील लुईझियाना येथील एका व्यावसायिकाने केलेले कार्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. यामुळे ग्रॅहम वॉकर या व्यक्तीला “रिअल लाईफ सांता” ही पदवी मिळाली आहे. ग्रॅहम वॉकर हा फायबरबॉन्ड कंपनीचा मालक आहे. ही कंपनी विकण्यापूर्वी ग्रॅहम वॉकरने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीच्या विक्रीचा थेट फायदा व्हावा अशी अट घातली होती.
2100 कोटींचा बोनस
समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या विक्रीतून मिळालेल्या एकूण उत्पन्नापैकी 15% रक्कम म्हणजे अंदाजे 2157 कोटी रुपये 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला सरासरी 4,43,000 डॉलर (अंदाजे 3.7 कोटी) बोनस म्हणून मिळणार आहेत. पुढील 5 वर्षांमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रॅहम वॉकरने हा निर्णय का घेतला?
ग्रॅहम वॉकरने या निर्णयाबद्दल बोलताना म्हटले की, ‘हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे घेण्यात आले आहे. अनेक कर्मचारी कठीण काळातही कंपनीसाठी काम करत होते. त्यामुळे मला त्यांच्या निष्ठेचा आदर करायचा होता, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. बोनसची रक्कम जूनपासून वाटण्यास सुरु झाली आहे. सुरुवातीला अनेक कर्मचाऱ्यांना हा विनोद वाटला, मात्र नंतर काहीजण भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते.
कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल
ग्रॅहम वॉकर यांच्या घोषणेमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. अनेकांना या पैशांचा वापर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केला. काहींनी गृहकर्ज फेडले, काहींनी मुलांच्या कॉलेज फी भरली. 1995 पासून कंपनीत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने या पैशातून स्वतःचे बुटीक उघडण्याचे स्वप्न पूर्ण केले. इतर कर्मचाऱ्यांनीही अनेक महत्त्वाची कामे केली.
हा निर्णय खास का आहे?
एखादी कंपनीची विक्री होते तेव्हा भागधारकांना बोनस मिळतो. मात्र ग्रॅहम वॉकर यांच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांकडे शेअर्स नव्हते, तरीही त्यांना फायदा झाला आहे. यामुळे ग्रॅहम वॉकर यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावरील एका यूजरने म्हटले की, ‘वाह, काय हिरो, काय कहाणी! अशा कृती मानवतेवरील विश्वास आणखी घट्ट करतात.’ दुसऱ्या म्हटले, ‘हा खरा बॉस आहे, जो त्याच्या टीमला कुटुंबाप्रमाणे वागवतो.’
