Salman Khan: 40 वर्षांपूर्वी जे घडलं, त्याचं तसूभरही..; सलमान खानबद्दल पीयूष मिश्रा स्पष्टच बोलले

'मैने प्यार किया'मध्ये सलमान खानने आपल्याला रिप्लेस केल्याची चर्चा चुकीची असल्याचं पीयूष मिश्रा यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. 'मला सलमानशी कधीच अडचण नव्हती, तो उत्तम स्टार आहे,' असं म्हणत त्यांनी 40 वर्षांपूर्वीच्या चर्चेवर पडदा टाकला.

Salman Khan: 40 वर्षांपूर्वी जे घडलं, त्याचं तसूभरही..; सलमान खानबद्दल पीयूष मिश्रा स्पष्टच बोलले
Salman Khan and Piyush Mishra
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 4:14 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने रातोरात स्टार बनवलं. मात्र, या चित्रपटातील प्रेमची भूमिका सलमानच्या आधी अभिनेता आणि लेखक पीयूष मिश्रा यांना ऑफर करण्यात आल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. सलमानने पीयूष यांना चित्रपटातून रिप्लेस केलं, अशीही चर्चा रंगली होती. आता जवळपास 40 वर्षांनंतर पीयूष मिश्रा यांनी या जुन्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सलमान खानचं कौतुक करत मला त्याच्याबद्दल कधीच कोणतीही अडचण नव्हती, असं सांगितलं आहे.

‘मला सलमानशी कधीच अडचण नव्हती’

दैनिक जागरणच्या ‘संवादी’ कार्यक्रमात पीयूष मिश्रा सहभागी झाले होते. यावेळी सूत्रसंचालकांनी त्यांना सलमान खानच्या नावावरून काही अडचण आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर पीयूष यांनी अतिशय स्पष्टपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, “मला कधीच अडचण नव्हती. मला कोणाकडूनही त्रास होत नाही. तो मस्त आहे, उत्तम स्टार आहे आणि चांगले पैसे कमावतो. मुली त्याच्यावर फिदा आहेत, माझ्यावरही फिदा आहेत. मला सुरुवातीपासूनच कोणतीही अडचण नव्हती. आजपासून 40 वर्षांपूर्वी जे काही घडलं, त्याचं मला तसूभरही वाईट वाटलं नव्हतं.”

Loading...

पुढे त्यांनी सांगितलं की, त्यानंतरही त्यांनी अनेक कामं केली. हा एक छोटासा प्रसंग होता, मात्र प्रसारमाध्यमांनी त्याला गरजेपेक्षा जास्त मोठं केलं. आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही सलमानचा उल्लेख योग्य त्या संदर्भात केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं होतं 40 वर्षांपूर्वी?

1989 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैने प्यार किया’ हा सूरज बडजात्या दिग्दर्शित चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सलमान खानने प्रेमची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, या भूमिकेसाठी सुरुवातीला पीयूष मिश्रा यांचाही विचार करण्यात आला होता. त्यावेळी पीयूष हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये शिक्षण घेत होते. चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांनी त्यांची भेट घेतली होती आणि चित्रपटासाठी मुंबईत येण्यास सांगितलं होतं. मात्र, पीयूष त्या वेळी मुंबईला गेले नाहीत. त्यांच्या मनात काही कारणांमुळे नाराजी होती आणि त्यांना जगाबद्दलही नकारात्मक भावना निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ही संधी पुढे नेली नाही. काही वर्षांनी ते मुंबईत आले, तेव्हा ‘मैने प्यार किया’मध्ये सलमान खानची निवड झाली होती. चित्रपटाच्या यशानंतर सलमान रातोरात लोकप्रिय झाला.

पीयूष मिश्रा यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की, सलमानने त्यांना चित्रपटातून रिप्लेस केलं नव्हतं. सुरुवातीच्या टप्प्यावर केवळ त्यांच्या नावाचा विचार झाला होता. त्यामुळे या घटनेला ‘भूमिका हिरावून घेतली’ असं म्हणणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us