सेटवर जोरदार भांडण अन् तणाव..; दीपिकानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा ‘ॲनिमल’ फेम दिग्दर्शकाशी पंगा, थेट चित्रपटातून बाहेर

संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरीट' या बहुचर्चित चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर येत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याचं कळतंय. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

सेटवर जोरदार भांडण अन् तणाव..; दीपिकानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा ॲनिमल फेम दिग्दर्शकाशी पंगा, थेट चित्रपटातून बाहेर
Sandip Reddy Vanga
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 09, 2026 | 10:52 AM

‘कबीर सिंह’ आणि ‘ॲनिमल’ या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगाच्या आगामी प्रोजेक्टविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. साऊथ सुपरस्टार प्रभासला सोबत घेऊन संदिपने ‘स्पिरिट’ची घोषणा केली खरी, परंतु सुरुवातीपासूनच हा चित्रपट विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिका साकारणार होती. परंतु जेव्हा दीपिकाने अचानक तिच्या मानधनात वाढ करून कामाचे तास फक्त 8 तासांपर्यंत मर्यादित करण्याची मागणी केली, तेव्हा मात्र निर्माते-दिग्दर्शकांनी तिला साफ मनाई केली. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार घेतली. आता दीपिकानंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची या चित्रपटातून एक्झिट झाल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी संदिप रेड्डी वांगाचा चित्रपट मधेच सोडल्याचं कळतंय.

‘ओटीटी प्ले’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘स्पिरीट’ची शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होती. तेव्हा प्रकाश राज आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यात एका गोष्टीवरून मतभेद झाले. सुरुवातीला या मतभेदाचं कारण स्क्रिप्ट आणि एक खास सीनचं शूटिंग होतं. परंतु नंतर या मतभेदाचं रुपांतर सेटवर एका गंभीर भांडणात आणि तणावात बदललं. क्रिएटिव्ह डिफरन्सशिवाय अशीही माहिती समोर येत आहे की शूटिंगदरम्यान काही व्यवहारासंबंधीच्या समस्या होत्या. काही गोष्टी प्रॉडक्शन टीमला अजिबात आवडल्या नाहीत. अखेर प्रकाश राज यांनी थेट चित्रपटातून काढता पाय घेतला. याविषयी अद्याप प्रकाश राज किंवा संदिप रेड्डी वांगाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.

जेव्हा ‘स्पिरीट’ या चित्रपटाची घोषणा झाली होती, तेव्हा त्यात प्रकाश राजचा दमदार आवाज ऐकायला मिळाला होता. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता प्रकाश राजच्या एक्झिटनंतर चित्रपटावर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिग्दर्शिक संदिप रेड्डी वांगा यांच्या फिल्ममेकिंग स्टाइलवर याआधी काहींनी टीका केली होती. वांगा त्यांच्या चित्रपटांमध्ये गरजेपेक्षा जास्त हिंसा दाखवतात, असा आक्षेप काहींनी नोंदवला होता.

‘स्पिरीट’ हा चित्रपट 5 मार्च 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभाससोबत तृप्ती डिमरी आणि विवेक ओबेरॉय यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात तृप्ती डिमरीने दीपिकाची जागा घेतली आहे.