AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढी घाई कशासाठी..? पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून रोहित पवारांना सुज्ञ पुणेकराचे रोखठोक पत्र, नेमका काय दिला सल्ला?

पुण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्याला कठोर पालकमंत्री द्या, किंवा सुनेत्रा पवार यांना अधिक ताकद द्या, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता एका पुणेकराने रोहित पवार यांना एक रोखठोक पत्र लिहिलं आहे.

एवढी घाई कशासाठी..? पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून रोहित पवारांना सुज्ञ पुणेकराचे रोखठोक पत्र, नेमका काय दिला सल्ला?
पुणेकराचे रोहित पवारांना पत्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 6:23 AM
Share

पुण्यामध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली, न्यायालयाच्या परिसरातच टोळक्याकडून एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर कोयत्याने हल्ला देखील करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका करताना मोठं विधान केलं होतं. पुण्याला कठोर पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा पवार यांना अधिक ताकद द्या, तसेच देवेंद्र फडणवीस पालकमंत्री झाल्यास पुण्याचे वाटोळे होईल, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता एका पुणेकराने रोहित पवार यांना खुलं पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये रोहित पवारांच्या या विधानामागे पुण्याची काळजी की राजकीय कुरघोडी असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अजित पवारांच्या निधनानंतर वर्षही पूर्ण झाले नसताना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर आणि नव्या नेतृत्वावर टीका करण्याऐवजी सुनेत्रा पवार यांना काम करण्यासाठी वेळ व संधी द्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय? 

‘रोहित पवार साहेब, दुसऱ्यांच्या नेतृत्वाची किंमत ठरवण्यापूर्वी स्वतःची राजकीय किंमत तपासा…! एका सुज्ञ पुणेकराचे मनाला भिडणारे, पण रोखठोक पत्र…!

रोहित पवार साहेब,

पुण्याला जरा कठोर पालकमंत्री द्या, नाहीतर सुनेत्रावहिनींना अधिक ताकद द्या, असे तुम्ही म्हणता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद घेतले तर पुण्याचे वाटोळे होईल, असेही विधान करता. तुमच्या या विधानांमागे पुण्याची काळजी आहे की राजकीय कुरघोडी, हा प्रश्न आज सुज्ञ पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. अजितदादा म्हणजे केवळ एक पालकमंत्री नव्हते. ते कामाचा धडाका, प्रशासनावर वचक, निर्णय घेण्याची धमक आणि विकासासाठी कोणाचीही मुलाहिजा न ठेवणारे नेतृत्व होते. पुणेकरांनी त्यांचे काम पाहिले आहे, अनुभवले आहे. त्यामुळे दादांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पण दादा आज आपल्यात नाहीत, म्हणून त्यांच्या पश्चात उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला सतत कमी लेखायचे का?

सुनेत्रावहिनी आज एका मोठ्या जबाबदारीतून मार्गक्रमण करत आहेत. दादांनी उभा केलेला विकासाचा वारसा पुढे नेणे, पक्षाची जबाबदारी सांभाळणे, प्रशासनावर पकड निर्माण करणे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी वेळ लागतो. त्यांना संधी देण्याऐवजी त्यांच्यावर राजकीय टीका करण्याची एवढी घाई कशासाठी?

वहिनी शांत आहेत, याचा अर्थ त्या कमजोर आहेत असे समजू नका. शांतपणे काम करणाऱ्यांची ताकद कधी कधी मोठमोठ्याने बोलणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते!

रोहितजी, तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात.

दुसऱ्यांच्या नेतृत्वावर बोट ठेवण्यापूर्वी एकदा स्वतःच्या राजकीय स्थानाचे आत्मपरीक्षण केले आहे का?

आज तुमची स्वतःच्या पक्षात नेमकी किती किंमत आहे, तुमच्या भूमिकेला पक्षात किती महत्त्व दिले जाते आणि तुमच्या मतांना पक्ष किती गांभीर्याने घेतो, याचा विचार आधी करा. दुसऱ्यांच्या नेतृत्वाची ताकद मोजण्यापूर्वी स्वतःचे राजकीय वजन तपासणे जास्त गरजेचे नाही का?

आश्चर्याची गोष्ट तर अशी की, तुमच्या विधानानंतर तुमच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांना किंवा पक्षाच्या वतीने खुलासा करावा लागतो की, रोहित पवारांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही, त्यांची भूमिका वेगळी आहे!

मग प्रश्न असा पडतो की, तुम्ही पक्षाचे नेते आहात की पक्षापेक्षा वेगळीच राजकीय वाट चालणारे स्वतंत्र प्रवक्ते?

पक्षाची भूमिका एक आणि तुमची भूमिका दुसरी, असे वारंवार दिसत असेल तर त्याचे आत्मपरीक्षण तुम्हीच करायला नको का? स्वतःच्या पक्षातच तुमच्या विधानांपासून अंतर ठेवण्याची वेळ येत असेल, तर दुसऱ्यांच्या नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी थोडे थांबून विचार करायला हवा. दुसऱ्यांची राजकीय उंची मोजण्यापेक्षा स्वतःच्या पायाखालची जमीन किती मजबूत आहे, हे पाहणे अधिक शहाणपणाचे असते!

आज तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावर भाष्य करताना दिसता. कधी एखादा प्रश्न, कधी एखादे आंदोलन, कधी सरकारवर टीका, तर कधी एखाद्या नेत्यावर निशाणा. प्रसिद्धी मिळते, चर्चा होते, बातम्या होतात; पण स्वतःच्या मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासने आणि त्यांचे प्रश्न यांचाही असाच पाठपुरावा करता का? राज्यभर फिरून प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवून दाखवणे अधिक महत्त्वाचे नाही का?

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या काळातही महाराष्ट्राने अनेक घडामोडी पाहिल्या. विवेकानंद पाटीलसारखा विद्यार्थी स्वतःच्या अभ्यासपूर्ण मांडणीने आणि भाषणांनी पुढे आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन उभे राहिले की त्याचे श्रेय कोणाला मिळाले, यापेक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला का, हे महत्त्वाचे असते. एखाद्या तरुणाने आपल्या कर्तृत्वाने पुढे येणे हे राजकारण्यांसाठी धडा असायला हवा, असुरक्षिततेचे कारण नाही.

रोहितजी, आणखी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. अजितदादा हे तुमचे काका होते. पण त्यापेक्षाही ते महाराष्ट्रातील एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या राजकीय अनुभवाचा, नावाचा आणि कामाचा तुम्हालाही निश्चितच फायदा झाला. आज त्यांच्याच पश्चात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर आणि त्यांनी उभ्या केलेल्या नेतृत्वावर वारंवार प्रश्न उपस्थित करताना थोडे तरी तारतम्य ठेवायला नको का?

आज दादांना जाऊन वर्षही पूर्ण झालेले नाही. अशा दुःखाच्या काळात कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना सावरण्याची गरज असताना राजकीय टोमणे मारून वातावरण तापवण्याची गरज काय? घरातील माणसांनीच एकमेकांचे पाय ओढायचे असतील, तर बाहेरच्या विरोधकांना वेगळे काही करण्याची गरजच काय? घर फोडायला बाहेरच्यांची गरज नसते; घरातल्यांनीच एकमेकांना समजून घेणे सोडले की भिंतींना तडे जायला वेळ लागत नाही!

पुण्याचे प्रश्न नक्कीच गंभीर आहेत. वाढती गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या यावर कठोर निर्णय झालेच पाहिजेत. पण प्रत्येक प्रश्नाला राजकीय रंग देऊन पालकमंत्र्यांची कार्यक्षमता मोजणे हा उपाय नाही. पुण्याला आरोप करणारे नेते नकोत, तर प्रश्न सोडवणारे नेतृत्व हवे आहे.

सुनेत्रावहिनीं यांच्याकडे राजकीय संस्कार आहेत, अनुभव आहे, संयम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दादांनी जवळून शिकवलेली कामाची पद्धत आहे. त्यांना अनावश्यक बडेजाव नाही. प्रसिद्धीचा हव्यास नाही. त्या शांतपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना कमी लेखण्यापेक्षा त्यांना अधिक ताकद द्या. प्रशासनावर वचक निर्माण करण्यासाठी आवश्यक मदत करा. त्यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवा. मग त्यांच्या कामाचे मूल्यमापन करा.

अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवर सुनेत्रावहिनी नक्कीच समर्थपणे पुढे जाऊ शकतात. त्यांच्यात नेतृत्वगुण आहेत. त्यांच्यात कणखरपणा आहे. त्यांचा शांत स्वभाव हा त्यांचा कमकुवतपणा नसून त्यांची कार्यशैली आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरकडूनही मिळाले आहे आणि अजितदादांच्या सहवासातून कामाचा अनुभवही मिळाला आहे. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी द्या.

रोहितजी, राजकारणात मोठे होण्यासाठी रोज एखादे विधान करावे लागत नाही. प्रत्येक विषयावर स्वतःची वेगळी भूमिका मांडावी लागत नाही. कधी कधी शांत राहून स्वतःच्या कामातून उत्तर देणेही महत्त्वाचे असते. गावाकडे एक म्हण आहे, सूर्यावर थुंकायला गेलं की थुंकी स्वतःच्याच अंगावर पडते! त्यामुळे दुसऱ्यांच्या नेतृत्वावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय भूमिकेचे आणि पक्षातील स्थानाचे एकदा प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करा.

आम्ही सुज्ञ पुणेकर आहोत. कोण काय बोलतंय, कोण काय करतंय आणि कोणाच्या बोलण्यात किती राजकारण आहे, हे आम्हाला समजतं. आम्हाला कोणाच्या घरातील राजकारणात पडायचे नाही. पण पुण्याच्या विकासाच्या बाबतीत कोणाचीही राजकीय कुरघोडी सहन करायची नाही. आज पुणेकरांच्या मनात अजितदादांविषयी प्रचंड आदर आणि भावना आहेत. त्यांच्या पश्चात सुनेत्रावहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना सावरण्यासाठी, कामाची गती मिळवण्यासाठी आणि स्वतःची कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे.

रोहित पवार साहेब, एक लक्षात ठेवा, राजकारणात वारसा मिळू शकतो, पद मिळू शकते, प्रसिद्धीही मिळू शकते; पण जनतेच्या मनातील विश्वास मात्र स्वतःच्या कर्तृत्वानेच कमवावा लागतो! दादांनी तो विश्वास आयुष्यभराच्या कामातून कमावला होता. आता तोच विश्वास पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्रावहिनी पार पाडत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ राजकीय भूमिका नाही, तर अजितदादांच्या विकासाच्या विचारांशी असलेली निष्ठा आहे.

आम्हाला पुण्याचे वाटोळे होऊ नये याची काळजी आहे; पण त्यासाठी कोणाला कमी लेखण्याची गरज नाही. आम्हाला दादांसारखी कामाची गती हवी, सुनेत्रावहिनींसारखे संयमी नेतृत्व हवे आणि पुण्याच्या विकासासाठी ठाम निर्णय घेणारे प्रशासन हवे!

वहिनी, तुम्ही पुढे चला. पुणेकर तुमच्या पाठीशी आहेत!

एक सुज्ञ पुणेकर’

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला