Prakash Raj : चित्रपट, जाहिरातींवर पाणी सोडलं, प्रकाश राज मोदींविरोधात भूमिका का घेतात? एक हत्या ठरलं कारण, पत्नीकडून मोठा खुलासा

Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांच्या पत्नीनं अभिनेत्याबद्दल एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज खूप खचले होते.

Prakash Raj : चित्रपट, जाहिरातींवर पाणी सोडलं, प्रकाश राज मोदींविरोधात भूमिका का घेतात? एक हत्या ठरलं कारण, पत्नीकडून मोठा खुलासा
| Updated on: Oct 30, 2026 | 9:37 PM

अभिनेता प्रकाश राज हे आपल्या राजकीय विचारांबाबत स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. प्रकाश राज यांची पत्नी आणि नृत्यदिग्दर्शिका पोनी वर्मा यांनी सांगितलं, २०१७ मध्ये त्यांची मैत्रीण, कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर प्रकाश राज पूर्णपणे खचून गेले होते, परंतु याच घटनेनं त्यांना ठाम भूमिका घेण्याची प्रेरणाही दिली. पोनी यांनी असंही सांगितलं की, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रकाश राज यांना अनेकदा कामाचं नुकसान सोसावं लागलं आहे, तरीही ते आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत.

काय म्हणाली प्रकाश राज यांची पत्नी?

Loading...

‘प्रेमा’ यांच्या यूट्यूब चॅनेलवर, पोनी यांना विचारण्यात आलं की, प्रकाश राज यांच्या राजकीय मतांमुळे त्यांना ज्या प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो, ते पाहता त्यांनी कधी प्रकाश राज यांना थोडा संयम राखण्यास सांगितलं होतं का? यावर पोनी म्हणाल्या, ‘सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. जेव्हा आम्हाला गौरी यांच्या हत्येची बातमी कळाली, तेव्हा मी प्रकाश यांना पूर्णपणे कोलमडलेलं पाहिले. ते खूप दुःखी होते आणि म्हणाले, ‘मी तिला वारंवार सावध करत होतो.’ ज्याप्रमाणे आज आम्हाला प्रकाश यांच्या सुरक्षेची काळजी वाटते, तशीच काळजी त्यांना गौरी यांच्याबद्दल काळजी वाटत होती. गौरी यांच्या निधनानं त्यांना आतून पूर्णपणे हादरवून सोडलं. त्यांनी ठरवलं की, आता आपणही बोललं पाहिजे. एक स्त्री म्हणून गौरी ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपलं मत मांडलं, हे पाहून प्रकाश प्रेरित झाले.’ पोनी यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटायची, तेव्हा प्रकाश राज त्यांना विचारायचे की, आपण किती काळ असं घाबरून जगायचं?

पोनी यांनी सांगितलं की, त्यांच्या ओळखीचे काही अभिनेते असे होते ज्यांना प्रकाश राज यांचं वागणं आवडत नसायचं. प्रकाश राज यांचे कौतुक करत त्या म्हणाल्या, ‘आज सगळेजण आपापल्या आयुष्यात सुखात आहेत, शूटिंग करत आहेत, पैसे कमवत आहेत आणि प्रत्येकाला सर्वांच्या नजरेत चांगलं राहायचं आहे. काही अभिनेते असे आहेत ज्यांना काम न मिळण्याची भीती बाळगण्याची गरज नसते, कारण त्यांच्यामुळे इतरांना काम मिळतं. प्रकाश राज यांच्या कारकिर्दीवर याचा किती मोठा परिणाम झाला, हे मला माहीत आहे. त्यांच्या हातातून जाहिराती गेल्या, चित्रपट काढून घेतले गेले, त्यांना आपल्या व्यावसायिक आयुष्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. पण प्रकाश राज यांचं म्हणणं असं आहे की, ‘माझा विवेक सांगतोय की जे घडत आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे मी ते स्वीकारू शकत नाही.’

दरम्यान, प्रकाश आणि गौरी ३५ वर्षांहून अधिक वर्ष चांगले मित्र होते. २०१७ मध्ये, बेंगळुरूमधील घरासमोर गौरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us