‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये; प्रवीण तरडेंची इच्छा, रितेश देशमुखबद्दल म्हणाले..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी रितेश देशमुखच्या फोनविषयी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली की 'देऊळ बंद 2' हा चित्रपट रितेशच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या पुढे जाऊ नये.

देऊळ बंद 2ने राजा शिवाजी सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये; प्रवीण तरडेंची इच्छा, रितेश देशमुखबद्दल म्हणाले..
Riteish Deshmukh and Pravin Tarde
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2026 | 2:32 PM

गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने आधीच बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर ‘देऊळ बंद 2’ने 90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची 100 कोटींच्या टप्प्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा विक्रम मोडू नये, असं वाटत असल्याचं म्हटलंय. इतकंच नव्हे तर पहिला फोन रितेश देशमुखनेच केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, “रितेश देशमुख खूप चांगला माणूस आहे. रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया यांचं मला खूप कौतुक वाटतं. जेव्हा त्यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफुल सुरू होता, तेव्हा त्याच्या काही दिवसांनी माझा ‘देऊळ बंद 2’ चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या अकरा दिवसांत माझ्या चित्रपटाने पन्नास कोटी रुपये कमावले, तेव्हा पहिला फोन मला रितेशचाच आला होता. त्याने माझं अभिनंदन केलं. माझा सिनेमा कितीही मोठा झाला तरी ‘राजा शिवाजी’चा रेकॉर्ड मोडू नये, असं मला वाटतं.”

“रितेशने मला फोनवर म्हटलं होतं, मला बरं वाटतंय की एक मराठी चित्रपट दुसऱ्या मराठी चित्रपटाला मागे टाकून पुढे जात आहे. तुम्ही माझ्याही पुढे जा. दोन आठवड्यांनी तुमच्या कोणीतरी पुढे जाईल, मग त्याच्याही पुढे आणखी एखादा चित्रपट जाईल. अशा रीतीने आपण मराठी सिनेमा मोठा करू. ही भावनाच किती सुंदर आहे. त्यामुळे रितेश देशमुख असो, नागराज मंजुळे असो, प्रवीण तरडे असो.. मराठी सिनेमा मोठा झालाच पाहिजे. फक्त माझ्या चित्रपटाच्या बाबतीत एकच गोष्ट सांगावीशी वाटते, की ‘राजा शिवाजी’ किंवा ‘सैराट’च्या मागे वाहिनी होती, मार्केटिंग टीम होती. पण ‘देऊळ बंद 2’च्या मागे कोणीच नव्हतं”, असं तरडे पुढे म्हणाले. ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, मोहन जोशी यांच्या भूमिका आहेत.

Follow Us