Priya Rajvansh : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या मुलांनी रचला हत्येचा कट; बंगल्यात सापडला मृतदेह अन्…
Bollywood Actress Murder Mystery : प्रिया राजवंश ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या मृत्यूनं कलाविश्वाला धक्का बसलेला. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश. आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट करूनही तिनं वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, तिच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक ठरला. २७ मार्च २००० रोजी प्रिया राजवंशची मुंबईतील जुहू येथील बंगल्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या पुतण्यांची नावं समोर आली होती. या घटनेनं संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती.
‘हीर रांझा’ चित्रपटातून मिळाली विशेष ओळख
प्रिया राजवंशचा जन्म ३० डिसेंबर १९३६ रोजी शिमला येथे झाला. तिचं मूळ नाव वीरा सुंदर सिंह असं होतं. अभिनयाची आवड असल्यामुळे तिनं लंडनमधील रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं.
लंडनमध्ये काढलेलं अभिनेत्रीचं एक छायाचित्र बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते चेतन आनंद यांच्या पाहण्यात आलं आणि तिचं नशीब बदललं. चेतन आनंद यांनी १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ या चित्रपटातून प्रियाला अभिनयाची संधी दिली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘हीर रांझा’ या चित्रपटातील हीरच्या भूमिकेमुळे प्रिया राजवंशला विशेष लोकप्रियता मिळाली.
‘हकीकत’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रिया राजवंश आणि दिग्दर्शक चेतन आनंद यांच्यात जवळीक निर्माण झाली. चेतन आनंद हे अभिनेते देव आनंद यांचे मोठे भाऊ होते. चेतन आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, पण त्यांनी लग्न केलं नव्हतं. चेतन आनंद यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रिया राजवंशनं काम केलं.
चेतन आनंद यांना पहिल्या पत्नीपासून केतन आणि विवेक अशी दोन मुलं होती. त्यांच्या आणि प्रिया राजवंशच्या नात्याला मुलांची पसंती नव्हती, अशी चर्चा होती. १९९७ मध्ये चेतन आनंद यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला. चेतन आनंद यांनी आपल्या मृत्युपत्रात जुहू येथील बंगल्यातील हिस्सा प्रिया राजवंशच्या नावावर केला होता. त्यामुळे त्यांच्या मुलांशी मालमत्तेवरून वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. याच मालमत्तेच्या वादातून हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप तपासादरम्यान करण्यात आला होता.
२७ मार्च २००० रोजी बंगल्यात आढळला मृतदेह
२७ मार्च २००० रोजी प्रिया राजवंश तिच्या जुहू येथील बंगल्यात मृतावस्थेत आढळल्या. सुरुवातीला अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले. मात्र, पोस्टमार्टममध्ये गळा आवळल्यामुळे आणि डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.या प्रकरणात चेतन आनंद यांची मुलं केतन आणि विवेक यांच्यासह घरातील दोन कर्मचाऱ्यांवरही संशय व्यक्त करण्यात आला. पुढे या चौघांना अटक करण्यात आली.या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी मालमत्तेच्या वादातून कट रचल्याचा आरोप केला होता. २००२ मध्ये सत्र न्यायालयानं चारही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं केतन आणि विवेक आनंद यांना जामीन मंजूर केला.