Coolie : रजनीकांत यांच्या ‘कुली’ने सर्वांचाच केला सुपडा साफ; ‘सैयारा’, ‘छावा’लाही टाकलं मागे

14 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी एक रजनीकांत यांचा 'कुली' आहे, तर दुसरा हृतिक रोशनचा 'वॉर 2' आहे. 'कुली'ने पहिल्याच दिवशी कमाईचे विक्रम रचले आहेत. 2025 या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'छावा'लाही या चित्रपटाने मागे टाकलंय.

Coolie : रजनीकांत यांच्या कुलीने सर्वांचाच केला सुपडा साफ; सैयारा, छावालाही टाकलं मागे
Saiyaara, Coolie and Chhaava
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 15, 2025 | 10:23 AM

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचं वय जरी 74 असलं तरी, मोठ्या पडद्यावर अजूनही त्यांचा दबदबा कायम आहे. 14 ऑगस्ट रोजी त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘कुली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर 2’लाही तगडी टक्कर दिली आहे. ‘वॉर 2’सुद्धा 14 ऑगस्ट रोजीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या कमाईत ‘कुली’ने ‘वॉर 2’ला मागे टाकलं. त्याचसोबत 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचंही सिंहासन आपल्या नावे केलं.

रजनीकांत यांच्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यापुढे ‘सैयारा’चीही कमाई फिकी पडली आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा गँगस्टर ड्रामा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, कुलीने पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 55 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्या तुलनेत ‘वॉर 2’ला फक्त 41 कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली आहे. ‘कुली’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रजनीकांत यांनी तब्बल 200 कोटी रुपये फी घेतल्याचं कळतंय.

‘कुली’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या वर्षातील सर्वांत मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. रजनीकांत यांच्या या चित्रपटाने ‘छावा’चाही रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. हा विक्रम आता ‘कुली’च्या नावावर आहे. ‘छावा’ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ने 21 कोटी रुपये कमावले होते.

‘कुली’मध्ये रजनीकांत यांच्यासोबतच नागार्जुन, सत्यराज, श्रुती हासन, पूजा हेगडे, आमिर खान आणि कन्नड अभिनेता उपेंद्र अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळत आहे. या चित्रपटाचा बजेटसुद्धा थक्क करणारं आणि त्यातील कलाकारांना मिळालेलं मानधनसुद्धा अवाक् करणारंच आहे. या चित्रपटाला बनवण्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा एकूण बजेट हा तब्बल 350 कोटी रुपये आहे. त्यापैकी ‘थलायवा’ रजनीकांत यांना सर्वाधिक मानधन मिळालं आहे.