
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पहायला मिळतेय. 2025 या वर्षातील हा यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. एकीकडे हा चित्रपट, त्यातील कलाकार आणि त्यांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच काहीजण त्यातील हिंसक दृश्यांवर टीकासुद्धा करत आहेत. प्रमाणापेक्षा अधिक हिंसा, रक्तपात यात दाखवल्याने अनेकांनी चित्रपटाचा विरोध केला आहे. आता या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले अभिनेते राकेश बेदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदी म्हणाले, “रामाने रावणाला कोणत्याही हिंसेशिवाय मारलं होतं का? आता जर एक खलनायक जो अत्यंत खतरनाक आहे, ज्याला लोक प्रचंड घाबरतात, तर मग साहजिकच दोन्ही बाजूंनी हिंसा होणारच ना?”
“तुम्ही चित्रपटाची कथा सांगत नाही आहात, तर त्याला दाखवत आहात. जर तुम्ही सत्य घटनांवर आधारित काही करत असाल तर ते एका दिवसात संपवलं जाऊ शकत नाही. एखादा खलनायक काय फक्त शिट्टी वाजवून मरणार का? एखाद्या चित्रपटात हिंसा दाखवण्यामागचा एक हेतू असतो, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. ल्यारीमध्ये विलेन ज्याप्रकारे त्यांच्या शत्रूंना मारतात, तेसुद्धा भीतीदायक आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला असंच मारत असाल तर तुम्हाला रणवीरची काय गरज असेल? हे मीसुद्धा केलंच असतं”, असं म्हणत त्यांनी दिग्दर्शकांची बाजू मांडली.
या मुलाखतीत राकेश बेदी यांनी रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवसुद्धा सांगितला. “मी या चित्रपटाच्या आधी रणवीरला भेटलोसुद्धा नव्हतो, पण त्याचं काम मी पाहिलं होतं. तो माझे शोज आणि चित्रपट पाहून मोठा झाला आहे आणि माझ्यासोबत काम करण्यासाठी तो फार उत्सुक होता. आमचे सीन्स परस्पर आदर आणि सामंजस्यने परिपूर्ण होते, मग ते फक्त अभिनेत्याच्या दृष्टीकोनातून नव्हते, तर माणुसकीच्या दृष्टीकोनातून होते. अक्षयसोबत मी थिएटर आणि इतर विविध मुद्द्यांवर खूप गप्पा मारायचो. सारा सर्वांना पाहून खूप प्रभावित झाली होती. परंतु तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आहे”, असं त्यांनी सांगितलं.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि संजय दत्त यांच्या भूमिका आहेत.