
‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2019 मध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेलरमधील कियाराचा बिकिनी लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या काही सेकंदांसाठी ट्रेलरमध्ये दिसलेल्या कियाराने तिच्या बिकिनी लूकमुळे चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. तिच्या याच लूकवर आता एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने अश्लील टिप्पणी केली आहे. त्यावरून नेटकरी संबंधित दिग्दर्शकावर चांगलेच भडकले आहेत.
कियाराच्या बिकिनी लूकवर अश्लील टिप्पणी करणारा हा दिग्दर्शक दुसरा-तिसरा कोणी नसून राम गोपाल वर्मा आहे. राम गोपाल वर्मा नेहमीत त्याच्या वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याच्या कमेंटमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर कियाराच्या बिकिनीतील फोटो शेअर करत त्यावर अश्लील कॅप्शन लिहिलं होतं. हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांना कियाराशी लिंक करून राम गोपाल वर्माने अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
‘इतकी घाणेरडी मानसिकता येते कुठून’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा सार्वजनिक ठिकाणी अशी पोस्ट लिहितो, तर खासगीत कसा वागत असेल’, असा सवाल दुसऱ्याने केला. तर ‘सोशल मीडियावर आपण काय लिहितोय याचं भान तरी आहे का’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी फटकारलं आहे. या ट्रोलिंगनंतर अखेर राम गोपाल वर्माने त्याची पोस्ट डिलिट केली. परंतु त्याचे स्क्रीनशॉट्स आतासुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘वॉर 2’मध्ये कियाराने पहिल्यांदाच बिकिनी सीन दिला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हृतिक, कियारासोबतच ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. ‘वॉर’ या पहिल्या भागाने जगभरात 475 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. पहिल्या भागाच्या यशस्वी कामगिरीनंतर आता सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.