इसको कुत्ता घुमाना है..; शेफालीच्या निधनानंतर परागला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री

अभिनेत्री शेफालीच्या निधनानंतर पाळीव श्वानाला फिरायला घेऊन गेल्यामुळे पराग त्यागीवर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली होती. आता अभिनेत्री रश्मी देसाईने ट्रोलर्ससाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने परागवर टीका करणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे.

इसको कुत्ता घुमाना है..; शेफालीच्या निधनानंतर परागला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री
शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2025 | 1:09 PM

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी निधन झालं. रात्री जेवल्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. पती पराग त्यागीने तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं समजतंय. शेफालीच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अशातच तिच्या निधनानंतर परागचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो शेफालीच्या निधनानंतर इमारतीखाली त्याच्या पाळीव श्वानाला फिरवताना दिसला होता. यावरून नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं. ‘एकीकडे पत्नीचं निधन झालं आहे आणि याला श्वानाला फिरवायचं आहे’, असं एकाने म्हटलं होतं. तर ‘पत्नीच्या निधनानंतरही हा इतका शांत कसा’, असा सवाल काहींनी उपस्थित केला होता. परागवर टीका करणाऱ्यांवर आता अभिनेत्री रश्मी देसाई भडकली आहे. सोशल मीडियावर तिने यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे.

रश्मी देसाईची पोस्ट-

‘अरे भावा, एखाद्याबद्दल लगेच मत बनवण्यापेक्षा आपण दया आणि करुणा पसरवुयात. त्यांच्यासाठी सिम्बा हा पाळीव श्वानापेक्षा अधिक होता. तो शेफालीचा जणू मुलगाच होता. तिने आईसारखी त्याची देखभाल केली आहे. तिच्या अचानक निधनानंतर त्याच्याही आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी मीडियाला विनंती करते की त्यांनी शेफालीच्या कुटुंबीयांच्या दु:खाचा, शोकाचा किमान आदर करावा. या कठीण काळातून सावरण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या. थोडीशी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवुया. प्रत्येक गोष्ट खळबळजनकरित्या दाखवण्याची गरज नाही’, अशी पोस्ट रश्मीने लिहिली आहे.

शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी शेफालीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं. अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. न्यायवैद्यक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रक्त आणि व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते.