
महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषिक वादावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मौन सोडलं आहे. भाषिक अभिमानाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेला किंवा हिंसेला त्यांनी ठामपणे विरोध केला आहे. त्याचसोबत स्थानिक भाषा आणि संस्कृतींचा आदर करण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेवरून मोठा वाद सुरू असून त्याला राजकीय वळण मिळालं आहे. भाषेवरून निर्माण झालेल्या वादावरून रेणुका शहाणे यांनी आपले विचार मोकळेपणे मांडले आहेत.
‘इनकंट्रोव्हर्शियल विथ पूजा चौधरी’ पॉडकास्टमध्ये रेणुका म्हणाल्या, “जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या ठिकाणी राहत असाल, तर स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी आदर बाळगणं ही चांगली गोष्ट आहे. ती भाषा बोलता येण्याचा मुद्दा नाही, पण ती शिकून घेण्याची इच्छा आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं आहे. मला असे लोक आवडत नाहीत, ज्यांना स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीला सामावून घेण्याची आवश्यकता वाटत नाही.”
दुसरीकडे मीरा रोडमध्ये मराठी बोलण्यावरून एका रेस्टॉरंटच्या मालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना त्या पुढे म्हणाल्या, “मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. लोकांचं असभ्य वागणं मला आवडत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही, अशा ठिकाणी जाऊन दोन-तीन लोकांच्या कानाखाली मारल्याने त्याचा भाषेला काहीही फायदा होणार नाही. आपल्याला ती भाषा लोकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवण्याचे मार्ग शोधावे लागतील, की लोकांना ती सोयीची वाटेल आणि ते आनंदाने त्याचा स्वीकार करतील. भाषा ही काही बळजबरीने लादण्याची गोष्ट नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रात अगदी लहानपणापासूनच हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात होते. मला वाटतं की ती एक निवड असावी, जी मीसुद्धा लहानपणी केली होती.”
रेणुका शहाणे यांचे पती आणि अभिनेते आशुतोष राणा यांनीसुद्धा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाषेच्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या बायकोची मातृभाषा मराठी आहे”, असं त्यांनी आधी मराठीत उत्तर दिलं. त्यानंतर ते पुढे म्हणाले, “मी असं मानतो की भाषा ही नेहमीच संवादाचा विषय असते. ती कधीच वादाचा विषय नसते. भारत हा इतका परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे सर्व गोष्टी स्वीकारल्या जातात. भारताचा विश्वास संवादावर आहे, वादावर नाही.”