
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर सबंध देशाला वेड लावलं होतं. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांचं दमदार अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट.. या सर्वांचीच जोरदार चर्चा झाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांसारखे नवोदित कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला भेटले. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिंकूने त्यातील एका इंटिमेट सीनच्या पडद्यामागील गोष्ट सांगितली आहे. आकाशसोबत किसिंग सीन करताना भीती वाटली नव्हती का, असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता.
इंटिमेट म्हणावं असा एखादा सीन त्या चित्रपटाच होता. तेव्हा तुला भीती वाटली नाही का? की आपले लोक बघतील तेव्हा कसं वाटेल, असा प्रश्न मुग्धा गोडबोले यांनी रिंकूला विचारला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “मी जेव्हा तो सीन ऐकला होता, तेव्हा मी घाबरले होते. पण जेव्हा मला नागराज मुंजळे दादा म्हणाला की, अगं दिसतं तसं करताना नसतं. त्यामुळे तो सीन करताना आम्ही खरंतर हसत होतो. मला आता कळतं की, ती कॅमेरा मूव्हमेंट होती आणि मी फक्त माझं डोकं वळवलं होतं. तेव्हा आम्ही फालतू गप्पा मारून हसत होतो. ते दिसत जरी वेगळं असलं तरी सीन करताना मला भीती वाटली नव्हती. आम्ही सगळे जण जवळपास चार महिने एकत्र राहिलो होतो. त्यामुळे आमच्यात एक प्रकारचा कम्फर्ट आला होता.”
चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सैराट’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आर्ची-परश्याची याड लावणारी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाली होती. सैराट या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. अजय-अतुलने या चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केलं. यातील गाणी आजसुद्धा लोकप्रिय आहेत.