काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
बारामतीमधील शरदचंद्र पवार एआय सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. गौतम अदानींनी शरद पवारांना आपले तीन दशकांचे मार्गदर्शक संबोधले. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी एआय मानवी नात्यांची जागा घेऊ शकत नाही, असे नमूद केले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्घाटनप्रसंगी एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड दिसून आली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. कार्यक्रमाच्या आसनव्यवस्थेनुसार शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, काही चर्चा करण्यासाठी अजित पवार हे शरद पवारांच्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसले आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.
याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात बारामतीच्या दोन खासदार म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची नावे घेतली. तसेच, आमदार रोहित पवार यांचाही उल्लेख केल्याने हशा पिकला. गौतम अदानी यांनी यावेळी शरद पवारांना आपले तीन दशकांहून अधिक काळचे मार्गदर्शक संबोधले. अदानींनी शरद पवारांना खाली वाकून नमस्कार देखील केला. सुप्रिया सुळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मानवी भावनांची आणि नात्यांमधील ओलाव्याची जागा घेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

