Riteish Deshmukh: “आमच्याकडून तुमचा अवमान झाला, मला माफ करा”; रितेशने का मागितली सर्वांसमोर माफी?

रितेश देशमुखने मागितली माध्यमांची माफी; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Riteish Deshmukh: आमच्याकडून तुमचा अवमान झाला, मला माफ करा; रितेशने का मागितली सर्वांसमोर माफी?
Riteish Deshmukh
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 28, 2022 | 7:39 AM

कोल्हापूर: अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रितेशने पत्नी जिनिलिया डिसूझासोबत कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे त्याला नंतर माध्यमांची माफी मागावी लागली. रितेशच्या पीआर टीमने माध्यमांना योग्य वागणूक न दिल्याची तक्रार एका पत्रकाराने केली. रितेशच्या बाऊंसरने पत्रकारांना कोल्हापुरातील हॉटेलमधून बाहेर ढकललं, असा आरोप करण्यात आला. नंतर जेव्हा रितेशने माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा त्याने सर्वांसमोर याप्रकरणी माफी मागितली.

काय म्हणाला रितेश?

“आमच्याकडून तुमचा अवमान झाला असेल तर मी माफी मागतो. मी कोणत्याही बैठकीचं आयोजन केलं नव्हतं. लग्नाला 11 वर्षे झाली, पण आम्ही कधीच महालक्ष्मीच्या मंदिरात देवीचं दर्शन घेतलं नव्हतं. म्हणून मी आणि जिनिलिया इथं आलो. दर्शनासाठी आलो असताना इथं चित्रपटाबद्दल बोलणं योग्य नाही. तुमच्यावरही महालक्ष्मीचा आशीर्वाद असू दे”, असं रितेश म्हणाला.

रितेशने नुकताच त्याचा 44 वा वाढदिवस साजरा केला. सलमान खानची बहीण अर्पिता खान, अभिनेत्री जेनिफर विंगेट, आशिष चौधरी, शाबिर आहलुवालिया या सेलिब्रिटींनी बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. रितेशच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सलमान खानने त्याच्या ‘वेड’ चित्रपटातील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेवरून पडदा उचलला.

वेड या चित्रपटाद्वारे रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या 30 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रितेश आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत आहेत. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.