Sachin Pilgaonkar: रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांनाही.. सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर स्पष्टच बोलले
Sachin Pilgaonkar: अभिनेते सचिन पिळगांवकर यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पिळगांवकर नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

Sachin Pilgaonkar: मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिन यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता एका मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा काम करण्यात आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यात अधिक रस असल्याचं त्यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न सचिन पिळगांवकर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्या लोकांनाही ट्रोल केलं जातं. अनेक लोक आपल्या घरात अन्न बनवून मूक प्राण्यांना खायला घालतात. त्यांच्या मते, ही अतिशय चांगली आणि संवेदनशील गोष्ट आहे. मात्र, अशा चांगल्या कामासाठीही लोकांना ट्रोल केलं जातं. मग मी कोण आहे, मी काय आहे?”
सचिन पिळगांवकर यांचे जिवलग मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही यापूर्वी ट्रोलिंगच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली होती. सचिन यांनी आज मिळवलेलं यश सहजासहजी किंवा वारशाने मिळालेलं नाही, तर त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, असं अशोक सराफ यांनी म्हटलं होतं. लहान वयापासूनच सचिन यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. अभिनयासोबतच दिग्दर्शन, सहाय्यक दिग्दर्शन, संगीत आणि एडिटिंग अशा विविध तांत्रिक गोष्टींचाही त्यांनी अभ्यास केला. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करून ट्रोल करणं योग्य नसल्याचं अशोक सराफ यांनी अधोरेखित केलं होतं. आजकाल ट्रोलिंग हा काही लोकांच्या फावल्या वेळेचा छंद झाला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती.
अशोक सराफ यांनी सचिन यांची बाजू घेतल्यानंतर, तुम्हालाही कधी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर द्यावंसं वाटत नाही का, असा प्रश्न सचिन यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ‘अशा ट्रोलर्सना उत्तर द्यायला किंवा त्यांना सुनवायला माझ्याकडे वेळ नाहीये. काम करण्यात माझा जास्त रस आहे. इथे मी माझा वेळ का वाया घालवू?’ असं ते म्हणाले. पुढे त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवण्याला अधिक महत्त्व दिलं. काम बाजूला ठेवून परिवाराबद्दल बोलायचं झाल्यास, पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रियाला परदेशात फिरायला घेऊन जाणं त्यांना अधिक आवडेल, असं त्यांनी सांगितलं. कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांतून मिळणारं समाधान हे ट्रोलर्सना उत्तर देण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.