Sachin Pilgaonkar : तो हळुहळू सावरत होता…अशोक सराफ यांना निवेदिता यांच्यासोबत करायचं नव्हतं लग्न, सचिन पिळगांवकरांनी सांगितला किस्सा
Sachin Pilgaonkar On Ashok Saraf And Nivedita Saraf Wedding : सचिन पिळगांवकर यांनी जुन्या मुलाखतीत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असून ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. 27 जून 1989 मध्ये अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी लग्नगाठ बांधली. पण, त्यांचं लग्न होण्यामागे सचिन पिळगांवकर यांचा हात होता. याबद्दल सचिन यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं. सचिन पिळगांवकर म्हणाले की, ‘सर्वात महत्त्वाची जोडी मी जमवली ती म्हणजे अशोक आणि निवेदिता. सुरुवातीला मला या दोघांबद्दल अजिबात माहिती नव्हतं. सुप्रियाला माहिती होतं.’
सचिन पिळगांवकर यांनी सांगितला किस्सा
‘आम्ही ‘कुणीतरी येणार गं’ या गाण्याच्या डान्सची रिहर्सल करत होतो. चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या तीन बायका रिहर्सल करत होत्या. एका बाजूला सुप्रिया, दुसऱ्या बाजूला निवेदिता आणि मध्ये मी. रिहर्सल करत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो. मी पडल्यावर निवेदिता धावत आली ‘अशोक…अशोक काय झालं?’ म्हणत होती. मी आधी तिच्याकडे पाहिलं मग, सुप्रियाला पाहिलं. मी सुप्रियाला डोळ्यांनी विचारलं काय सुरू आहे? तर सुप्रियाने सुद्धा होकारार्थी मान हलवली. तेव्हा मला समजलं की, असं काहीतरी घडतंय.’
‘अशोक लग्नाला नाहीच म्हणत होता, लग्न वगैरे काही नकोय असं त्याचं म्हणणं होतं. त्याआधी त्याचा अपघात झाला होता, त्यामुळे तो अत्यंत त्रासात होता. त्याला दुखापत झाली होती, त्यातून तो हळुहळू सावरत होता. काम सुरू केल्यामुळे त्याला कामाच्या माध्यमातून एक वेगळं समाधान मिळत होतं. एकंदर काम करून तो खूश होता, कामात अतिशय व्यग्र होता. मग मी त्याची समजूत काढली होती. कारण, निवेदिताला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. बरं, दुसऱ्या बाजूला निवेदिताची आई या लग्नाच्या अतिशय विरोधात होती. मग अशोक आणि मावशी या दोघांची समजूत काढत शेवटी 27 जून 1989 मध्ये हे लग्न झालं.’ असं सचिन यांनी शेवटी सांगितलं, ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर बोलत होते.