आधी मेकअप कमी थाप.., नमाज पठण करण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं

सनाच्या या व्हिडीओमुळे धार्मिक शिकवण, वैयक्तिक आचरण आणि सोशल मीडियावरील टीका यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. काही जण तिच्या संदेशाशी सहमत आहेत, तर काहींनी तिच्या लूकवर आक्षेप घेतला आहे.

आधी मेकअप कमी थाप.., नमाज पठण करण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं
सना खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2026 | 3:36 PM

एकेकाळी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने मनोरंजनविश्वात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सना खान सध्या तिच्या धार्मिक विचारांमुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये मनोरंजनविश्वाला रामराम ठोकून धार्मिक मार्ग स्वीकारणाऱ्या सनाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने लोकांना नमाज पढण्याचं आणि आपल्या मुलांनाही नमाजचं महत्त्व शिकवण्याचं आवाहन केलं. मात्र, तिच्या या संदेशापेक्षा तिच्या चेहऱ्यावरील मेकअपचीच अधिक चर्चा सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकवर प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल केलं. सना खान अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धार्मिक विचार मांडताना दिसते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्येही तिने नमाज आणि धार्मिक आचरणाचं महत्त्व अधोरेखित केलं.

सनाने सांगितलं की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नमाज नसेल, तरीही तिचं आयुष्य सुखात आणि आनंदात जात असेल, तर त्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. तिच्या मते, अल्लाहने एखाद्या व्यक्तीला या जगातच सर्वकाही दिलं असेल आणि परलोकासाठी काहीच शिल्लक नसेल, तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परलोकाची काळजी घ्यावी आणि नियमित नमाज पढावी, असं आवाहन तिने केलं. या व्हिडीओसोबत सनाने दिलेल्या कॅप्शनमध्येही नमाजच्या महत्त्वावर भर दिला. स्वतःच्या परलोकाची काळजी घेण्यासोबतच मुलांनाही नमाजचं महत्त्व समजावून सांगावं, असं तिने म्हटलं.

Loading...

सनाने व्हिडीओमध्ये हिजाब परिधान केला होता. मात्र, तिच्या चेहऱ्यावरील मेकअप आणि लूक पाहून काही सोशल मीडिया युजर्सनी टीका केली. धार्मिक आचरणाबद्दल सल्ला देताना स्वतःच्या वागण्यातही त्याचं प्रतिबिंब दिसायला हवं, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली. काहींनी तिच्या भुवयांच्या आकारावर आणि चेहरा पूर्णपणे झाकलेला नसल्यावरही टिप्पणी केली. धार्मिक शिकवण देताना ती स्वतः त्या नियमांचं पालन करते का, असा प्रश्न उपस्थित करत काहींनी तिच्यावर टीका केली.

सना खानने 2020 मध्ये मनोरंजनविश्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर तिने मुफ्ती अनस सैयद यांच्याशी विवाह केला. अभिनय, प्रसिद्धी आणि ग्लॅमरपासून दूर जाण्याचा निर्णय हा स्वतःच्या अंतर्मनातील बदलातून घेतल्याचं तिने यापूर्वी स्पष्ट केलं आहे. तिच्या मते, आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळाल्यानंतरही मनःशांतीचा शोध सुरू राहतो. त्यामुळे तिने धार्मिक मार्गावर चालण्याचा आणि मानवसेवा करण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us