जेलमध्ये डबल मर्डरच्या आरोपीने माझी दाढी..; संजय दत्तने किस्सा सांगताच उंचावल्या सर्वांच्या भुवया

अभिनेता संजय दत्तने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हा किस्सा सांगितला आहे. पुण्याच्या येरवडा तुरुंगातील त्याचा हा किस्सा ऐकताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय दत्तला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

जेलमध्ये डबल मर्डरच्या आरोपीने माझी दाढी..; संजय दत्तने किस्सा सांगताच उंचावल्या सर्वांच्या भुवया
Sanjay Dutt
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2025 | 4:02 PM

अभिनेता संजय दत्तचं आयुष्य खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याच्या आयुष्यातील चढउतार अनेकांना माहीत आहे. आईच्या निधनानंतर त्याच्या मनावर झालेला आघात, पोलिसांकडून झालेली अटक आणि तुरुंगात काढलेले दिवस.. हे संजूबाबाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी कनेक्शनप्रकरणी संजयला तुरुंगात जावं लागलं होतं. आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये तो तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “माझ्या आयुष्यात जे काही घडलं, त्याचा मला पश्चात्ताप नाही. मला एकाच गोष्टीचा पश्चात्ताप आहे की, माझे आईवडील मला खूप लवकर सोडून गेले. मला त्यांची खूप आठवण येते”, असं तो म्हणाला.

तुरुंगातील दिवसांबद्दल संजयने पुढे सांगितलं, “मी तिथे खुर्च्या आणि पेपर बॅग्स बनवले आणि त्याचे मला पैसे मिळायचे. त्यानंतर मी रेडिओ स्टेशनसुद्धा सुरू केलं होतं. ते फक्त तुरुंगातच ऐकवलं जायचं. त्यासाठीही मला पैसे मिळत होते. तिथे माझा रेडिओ प्रोग्रॅम होता. आमच्याकडे चर्चेसाठी काही विषय असायचे आणि आम्ही कॉमेडीसुद्धा केली. तुरुंगातील इतर तीन-चार जण मिळून प्रोग्रॅमसाठी स्क्रिप्ट लिहायचे. मी तिथे माझा थिएटर ग्रुपसुद्धा सुरू केला होता. त्यात मी दिग्दर्शक होतो आणि खुनाच्या आरोपातील इतर कैदी माझे अभिनेते होते.”

यावेळी संजू बाबाने तुरुंगातील एक किस्सासुद्धा सांगितला, जो ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तो म्हणाला, “मला आठवतंय की, माझी दाढी खूप वाढली होती आणि तुरुंगाच्या अधीक्षकांनी मला शेविंग करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी त्यांनी एका व्यक्तीला पाठवलं होतं. त्याचं नाव मिश्राजी होतं. जेव्हा त्यांनी दाढी करण्यासाठी रेझर काढला, तेव्हा मी त्याला विचारलं की, तुला तुरुंगात किती काळ झाला? त्यावर त्याने उत्तर दिलं की, 15 वर्षे. तोपर्यंत त्याची रेझर माझ्या मानेपर्यंत पोहोचली होती. पुढे मी त्याला विचारलं की, कोणत्या गुन्ह्यामुळे त्याला तुरुंगात यावं लागलं. तेव्हा तो म्हणाला ‘डबल मर्डर’. मी लगेच त्याचा हाथ धरला आणि त्याला थांबवलं.”

1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्यावेळी तो पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता.