
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हा सतत चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी छावा सिनेमामध्ये अक्षय खन्नासोबत काम केले होते. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी अक्षरश: प्रेमाचा वर्षाव केला. आता संतोष जुवेकरने नव्या वर्षाची दमदार सुरुवात केल्याचे दिसत आहे. संतोषने नवी गाडी खरेदी केली आहे. या नव्या गाडीचा व्हिडीओ संतोषने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी संतोषला चांगलेच ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
संतोष जुवेकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवी गाडी खरेदी केल्यानंतरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. संतोषसाठी नव्या वर्षाची सुरुवात नव्या गाडीने झाल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ शेअर करत संतोषने, देखोना guysss देखोना! ! आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने आणि तुम्हां सर्वांच्या प्रेमा आणि शुभेच्छांमुळे नवीन वर्षातनवीन पेटीपॅक गाडी घेतली महाराजा, आता प्रवासही नव्याने सुरु, चांगभलं बाप्पा मोरया असे कॅप्शन दिले आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने दादा तुझे खूप खूप अभिनंदन असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने खूप अभिनंदन दादा, तुझ्या गाडीमध्ये एक राऊंड हवा अशी कमेंट केली आहे. एका यूजरने आता तरी जा आणि रहमान डकैतला भेट आणि एक राऊंड मारायला घेऊन जा असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने जाळणारे : मी बघितलं पण नाही तिकडे.. मी बघूच शकत नाही असे म्हणत ट्रोल केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
संतोषने एका मुलाखतीमध्ये छावा चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.”