एका ऑम्लेटमुळे पकडला आरोपी… बॉयफ्रेंडच निघाला सैतान; कसा झाला ब्लाईंड मर्डरचा खुलासा ?
ग्वाल्हेरमधील एका ब्लाइंड मर्डर प्रकरणाने सर्वांना धक्का बसला आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. एका ऑम्लेटच्या तुकड्यामुळे आरोपी बॉयफ्रेंडपर्यंत पोहोचले. प्रेयसी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याच्या संशयावरून बॉयफ्रेंडने तिची निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने वाचण्याचा बराच खटाटोप केला. पण पोलिसांनी अखेर त्याला शोधून काढलेच. खरं तर पोलिसांसमोर ही ब्लाइंड मर्डर मिस्ट्री (crime news) केस होती. पण पोलिसांनी एआयच्या मदतीने ही केस सॉल्व्ह केली. त्यामुळे पोलिसांसाठी ही नवीन पद्धत अधिकच फायद्याची ठरणार आहे. ग्वाल्हेर पोलिसांनी टीकमगड येथील एका महिलेच्या हत्येची केस अत्यंत नाट्यमय रित्या सोडवली आहे. महिलेच्या खिशातील ऑम्लेटच्या एका छोट्या तुकड्यामुळे आरोपी पकडला गेला. काय घडलं नेमकं?
पोलिसांनी आता गुन्ह्याची उकल करण्यासाठी एआयचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचा चांगला रिझल्टही येत आहे. ग्वाल्हेरमध्ये एका महिलेच्या मर्डरची केसही पोलिसांनी अशीच सोडवली. आरोपीने महिलेचा खून केला. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर तिचा चेहरा आणि डोकंही छिन्नविछिन्न करून टाकलं. पण एका ऑम्लेटच्या तुकड्यामुळे आरोपी पकडला गेला.
ग्वाल्हेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सुनसान डोंगरावर पोलिसांना एका महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. हत्येची पद्धत अत्यंत क्रूर होती. महिलेची ओळख लपवण्यासाठी आरोपीने एका मोठ्या दगडाने त्या महिलेचा चेहरा ठेचला होता. त्यामुळे त्या महिलेची ओळख पटवणं कठिण होतं. पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पोलिसांनी हरवलेल्या महिलांच्या तक्रारी शोधल्या. पण त्यातही काही हाती लागलं नाही.
अंडी विक्रेत्याने जे सांगितलं…
ग्वालियरच्या पोलीस अधीक्षकाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले. पारंपरिक तपास पद्धती निष्फळ ठरू लागल्यानंतर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या तांत्रिक तज्ज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सॉफ्टवेअरच्या मदतीने तपास पुढे नेला. महिलेच्या छिन्नविछिन्न चेहऱ्याच्या हाडांची रचना आणि उपलब्ध अवशेषांच्या आधारे एआयने तिचा डिजिटल चेहरा तयार केला. हा चेहरा घटनास्थळाच्या परिसरातील अंडी विकणाऱ्यांना दाखवण्यात आला. तेव्हा एका अंडेविक्रेत्याने महिलेची ओळख पटवली आणि काही दिवसांपूर्वी ही महिला दोन पुरुषांसोबत ऑम्लेट खाण्यास आली होती, अशी माहिती दिली. एवढी माहिती मिळताच पोलिसांना मोठं यश हाती लागलं.
ऑम्लेटमुळे आरोपीपर्यंत…
महिलेची ओळख पटल्यानंतर या महिलेच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या काही तासांच्या घटनाक्रमाची पोलिसांनी माहिती गोळा केली. त्याची संगतवार जुळणी केली. त्यात तिला एका युवकासोबत शेवटचे पाहण्यात आल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्थानिक दुकानदारांकडून माहिती गोळा केली. त्यावेळी एका अंड्याच्या ठेलावाल्याने महत्त्वाची माहिती दिली. त्याने सांगितले की हत्येच्या थोड्याच वेळ आधी एक युवक आणि युवती त्याच्या ठेल्यावर आले होते आणि युवकाने प्रेमाने युवतीला ऑम्लेट खाऊ घातले होते. त्या ठेलेवाल्याने दिलेले युवकाचे वर्णन मृत महिलेच्या एका जवळच्या मित्राशी जुळणारे होते.
ही माहिती मिळताच पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं. त्याच्या एका सहकाऱ्यालाही ताब्यात घेतलं. दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले. बॉयफ्रेंडने महिलेसोबत प्रेम संबंध असल्याची कबुली दिली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. ही महिला दुसऱ्या कुणाबरोबर तरी बोलत असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळेच तिला त्याने मारण्याचा प्लान आखला. तिला डोंगरावर फिरण्याच्या बहाण्याने बोलावलं. तिला वाटेत ऑम्लेट खायला घातलं अन् डोंगरावर नेऊन तिची हत्या केली. आरोपीने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून तुरंगात टाकलं आहे.
