संपूर्ण जगाशी भांडू शकतो पण..; भाऊ फैजलच्या गंभीर आरोपांवर आमिर खानने सोडलं मौन
भाऊ फैजल खानने आमिरवर अनेक गंभीर आरोप केले होते. मला घरात नजरकैदेत ठेवलं, बळजबरीने औषधं दिली, असे आरोप त्याने विविध मुलाखतींमध्ये केले होते. या आरोपांवर अखेर आमिरने मौन सोडलं आहे. फैजलच्या आरोपांवर आमिरने त्याची बाजू मांडली आहे.

अभिनेता आमिर खानप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही बॉलिवूडमध्ये स्वत:ची खास ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. फैजलचं व्यावसायिक आयुष्य कदाचित चर्चेत नसेल, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. एका मुलाखतीमध्ये त्याने भाऊ आमिर खानविरोधात धक्कादायक दावे केले होते. आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात कोंडून ठेवलं होतं, असा दावा फैजलने केला होता. “मला एक वर्षभर आमिरच्या घरात कोंडून ठेवलं होतं आणि बळजबरीने औषधं दिली होती. मला स्किझोफ्रेनिया आहे आणि माझ्यामुळे समाजाला धोका आहे, असं म्हणत त्यांनी मला कोंडून ठेवलं होतं. त्या औषधांचा माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता,” असे आरोप फैजलने केले होते. या सर्व आरोपांवर आता आमिरने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो भावाच्या आरोपांवर आणि फ्लॉप झालेल्या ‘मेला’ या चित्रपटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
काय म्हणाला आमिर खान?
“काय करू? हीच माझी नियती आहे. तुम्ही संपूर्ण जगाशी भांडू शकता पण तुमच्या स्वत:च्या कुटुंबाशी कसं भांडणार? माझ्यासाठी माझा प्रत्येक चित्रपट महत्त्वाचा आहे. ‘मेला’च्या अपयशाने निश्चितच मला फरक पडला होता. तो काळ फैजसाठी जितका कठीण होता, तितकाच तो माझ्यासाठीही होता. जितकी त्या चित्रपटाची क्षमता होती, त्या हिशोबाने काम न करू शकल्याने मी स्पष्टपणे निराश होतो. संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली होती. आम्ही सर्वजण निराश झालो होतो”, असं आमिर म्हणाला.
फैजलचे आरोप
“माझ्या सर्व आर्थिक आणि कायदेशीर निर्णयांवर आमिरने नियंत्रण ठेवलं होतं. मला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. माझ्या खोलीबाहेर एक बॉडीगार्ड सतत तैनात असायचा. मी आमिरला मला दुसऱ्या घरात हलवण्याची विनंती केली होती. मी मदतीसाठी अक्षरश: प्रार्थना करायचो. माझे वडील माझ्या मदतीसाठी पुढे सरसावतील, अशी मला आशा होती. तिथून बाहेर कसं पडायचं, ते मला समजत नव्हतं. आमिरने माझ्याकडून मोबाइल फोन काढून घेतला होता. वर्षभरानंतर जेव्हा मी त्याच्याकडे दुसऱ्या घरात राहण्याविषयी आग्रह धरला, तेव्हा त्याने मला परवानगी दिली”, असे आरोप फैजलने केले होते.
फैजलने 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘मधहोश’ आणि ‘चिनार दास्तान-ए-इश्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
