आमिरने मला वर्षभर कोंडून ठेवलं, बळजबरीने..; भाऊ फैजल खानकडून धक्कादायक खुलासे
अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भावावर धक्कादायक आरोप केले आहेत. वर्षभर आमिरने मला त्याच्या घरात कोंडून ठेवलं होतं, असा दावा फैजलने केला आहे.

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही सिनेसृष्टीत स्वत:ची खास ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. फैजलचं व्यावसायिक आयुष्य कदाचित चर्चेत नसेल, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता फैजल त्याच्या एका मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये त्याने भावाविरोधात धक्कादायक दावे केले आहेत. भाऊ आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात कोंडून ठेवलं होतं, असा दावा फैजलने केला आहे.
आमिरने वर्षभर भावाला घरात ठेवलं कोंडून
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत फैजल म्हणाला, “मला एक वर्षभर आमिरच्या घरात कोंडून ठेवलं होतं आणि बळजबरीने औषधं दिली होती. मला स्किझोफ्रेनिया आहे आणि माझ्यामुळे समाजाला धोका आहे, असं म्हणत त्यांनी मला कोंडून ठेवलं होतं. त्या औषधांचा माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता. माझं वजन 103 किलोंपर्यंत वाढलं होतं. कारण ती औषधं माझ्यासाठी अनावश्यक आणि हानिकारक होती. या गोष्टींमुळे माझ्या करिअरमध्ये अनेक समस्या निर्णाण झाल्या होत्या. हे सर्व एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखं होतं. जिथे माझं संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात होतं.”
View this post on Instagram
“माझ्या सर्व आर्थिक आणि कायदेशीर निर्णयांवर आमिरने नियंत्रण ठेवलं होतं. मला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. माझ्या खोलीबाहेर एक बॉडीगार्ड सतत तैनात असायचा. मी आमिरला मला दुसऱ्या घरात हलवण्याची विनंती केली होती. मी मदतीसाठी अक्षरश: प्रार्थना करायचो. माझे वडील माझ्या मदतीसाठी पुढे सरसावतील, अशी मला आशा होती. तिथून बाहेर कसं पडायचं, ते मला समजत नव्हतं. आमिरने माझ्याकडून मोबाइल फोन काढून घेतला होता. वर्षभरानंतर जेव्हा मी त्याच्याकडे दुसऱ्या घरात राहण्याविषयी आग्रह धरला, तेव्हा त्याने मला परवानगी दिली”, अशा शब्दांत फैजल व्यक्त झाला.
याआधी फैजलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेजे रुग्णालयात त्याची 20 दिवस मानसिक तपासणी करण्यात आली होती, ज्यामध्ये तो निरोगी आढळला होता. फैजलने 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘मधहोश’ आणि ‘चिनार दास्तान-ए-इश्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
