
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका एका मराठी टीव्ही अभिनेत्याला बसला आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत नीलची भूमिका साकारणारा अभिनेता सुप्रित कदमचा 7 फेब्रुवारी रोजी अपघात झाला. सुप्रितने इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट करत या अपघाताविषयी माहिती दिली आहे. वांद्रे-कार्टर रोडवर संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास सुप्रितच्या बाईकचा अपघात झाला. रस्त्यावर लाइट्स नसल्याने सुप्रितला समोरचं नीट दिसलं नाही आणि अचानक त्यात समोर काळा कुत्रा त्याच्या गाडीसमोर आला. अपघात मोठा झाला, पण हेल्मेटमुळे सुप्रितचा जीव वाचला. सुप्रितने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या हातावरील जखमा दिसत आहेत.
‘फोटो टाकण्यामागे कारण असं आहे की वांद्रे-कार्टर रोडवर 7 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता माझा अपघात झाला. रस्त्यावरच्या लाइट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईकखाली आला. सांगायचा मुद्दा असा की अपघात मोठा झाला, पण मी थोडक्यात बचावलो, माझ्या हेल्मेटमुळे. आपण गाडी कितीही सुरक्षित चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात. हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो. कृपया हेल्मेट आवर्जून वापरा,’ असं त्याने लिहिलं आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका सुप्रितला बसला आहे. रस्त्यावर लाइट असती आणि पुरेसा प्रकाश असता कदाचित हा अपघात झाला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे. अनेकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. प्रामाणिकपणे कर भरूनही मुलभूत सुविधाही व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सुप्रितच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. ‘काळजी घे भावा’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतकं लागलंय तरी तू रोज 14 तास काम करतोय, तुला सलाम’ असं मालिकेत सावलीची भूमिका साकारणाऱ्या प्राप्ती रेडकरने म्हटलंय. ‘बापरे, काळजी घे मित्रा’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सुप्रितने सारंगचा मोठा भाऊ नीलची भूमिका साकारली आङे. कुटुंबावर प्रेम करणारा, शांत स्वभावाचा नील त्याने साकारला आहे. परंतु त्याची पत्नी ऐश्वर्या मात्र कट-कारस्थानं करताना दिसते.