Pathaan | ‘पठाण’च्या यशावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला ‘जे सुरू केलं आहे ते पूर्ण..’

'पठाण'ने पहिल्याच दिवशी देशभरात 54 कोटी तर जगभरात 100 ते 110 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचं ट्विट चर्चेत आलं आहे.

Pathaan | पठाणच्या यशावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला जे सुरू केलं आहे ते पूर्ण..
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 27, 2023 | 5:56 PM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळतोय. पठाणच्या यशावर आता शाहरुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शाहरुखने ट्विट करत त्याच्या चाहत्यांना मोलाचा सल्लासुद्धा दिला आहे. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी देशभरात 54 कोटी तर जगभरात 100 ते 110 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले आहेत. या यशाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचं ट्विट चर्चेत आलं आहे.

ट्विटरवर शाहरुखने 1997 मधल्या ‘गटाका’ या चित्रपटातील एक लोकप्रिय ओळ पोस्ट केली आहे. ‘मी पुन्हा पोहून जाण्यासाठी काहीच शिल्लक ठेवलं नाही’, अशी ती ओळ आहे. यापुढे त्याने लिहिलं, ‘मला वाटतं आयुष्यसुद्धा थोडंफार असंच आहे. तुम्हाला तुमच्या परतीची योजना करायची नाही. तुम्हाला पुढे जायचं आहे. पुन्हा मागे येऊ नका. जे सुरू केलंय ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एका 57 वर्षीय व्यक्तीचा हा सल्ला आहे.’

शाहरुखच्या या ट्विटवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘शाहरुख तुझ्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे कधीच हार मानू नये’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू कधीच दूर गेला नव्हतास, नेहमीच चाहत्यांच्या हृदयात होतास’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलंय. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.