Pathaan: ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘पठाण’चं प्रमोशन करणार नाही; असं का म्हणाला शाहरुख?

सलमान खानच्या 'बिग बॉस 16' आणि कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये मोठमोठे कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात. मात्र शाहरुखने कोणत्याच शोमध्ये हजेरी लावली नाही.

Pathaan: द कपिल शर्मा शोमध्ये पठाणचं प्रमोशन करणार नाही; असं का म्हणाला शाहरुख?
Shah Rukh Khan and Kapil Sharma
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 22, 2023 | 9:14 AM

मुंबई: बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘पठाण’ची कमाई दमदार होणार असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. शाहरुखच्या कमबॅकचा हा चित्रपट असला तरी दुसरीकडे त्याचं प्रमोशन तितक्या धमाकेदार पद्धतीने झालं नसल्याचं दिसतंय. सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ आणि कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मोठमोठे कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात. मात्र शाहरुखने कोणत्याच शोमध्ये हजेरी लावली नाही.

शाहरुख खान आणि कपिल शर्मा यांच्यातील खास मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. याआधी शाहरुख त्याच्या मोठमोठ्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. मात्र आता पठाणच्या प्रमोशनसाठी तो कोणत्याच शोमध्ये हजेरी लावत नसल्याने चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

शाहरुखने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनद्वारे ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने द कपिल शर्मा शोमध्ये येणार नसल्याचं स्पष्ट केलं. एका युजरने शाहरुखला प्रश्न विचारला, ‘सर यावेळी द कपिल शर्मा शोमध्ये येत आहेस की नाही?’ त्यावर उत्तर देत किंग खानने लिहिलं, ‘भावा, आता थेट सिनेमा थिएटरमध्येच येईन, तिथेच भेटू.’

शाहरुखचं उत्तर

पठाण या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 32 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना शाहरुखने व्यक्त केली.

“मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र ते मी बनू शकलो नाही. कारण त्यांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे”, असं तो म्हणाला.