बक्षिसाची रक्कम 25 लाख, मिळाले फक्त इतके रुपये; ‘बिग बॉस मराठी’च्या शिव ठाकरेकडून पोलखोल

| Updated on: Mar 28, 2024 | 8:50 AM

'बिग बॉस' या शोचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. हा शो जितका हिंदीत पाहिला जातो, तितकाच तो मराठी, तेलुगू यांसारख्या स्थानिक भाषांमध्ये पाहिला जातो. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे ठरला होता. मात्र त्याला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली, याचा खुलासा त्याने केला.

बक्षिसाची रक्कम 25 लाख, मिळाले फक्त इतके रुपये; बिग बॉस मराठीच्या शिव ठाकरेकडून पोलखोल
Shiv Thakare and Mahesh Manjrekar
Image Credit source: Instagram
Follow us on

टेलिव्हिजनवरील सर्वांत चर्चेतला रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ हा केवळ हिंदी भाषेतच नाही तर इतरही स्थानिक भाषांमध्ये लोकप्रिय आहे. बिग बॉस मराठी, बिग बॉस तेलुगू यांचाही मोठा प्रेक्षकवर्ग आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे ठरला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवने ‘बिग बॉस मराठी 2’ जिंकल्यानंतर त्याला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेबद्दल मोठा खुलासा केला आहे. शिव ठाकरे म्हणाला की त्याला बक्षिसाची रक्कम पूर्ण मिळालीच नव्हती. या सिझनमध्ये वीणा जगताप, शिवानी सुर्वे, नेहा शीतल, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे हे स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.

बक्षिसाच्या आकड्यापेक्षा निम्मीसुद्धा रक्कम मिळाली नाही

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्ट शोमध्ये शिव ठाकरेने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने बिग बॉसच्या बक्षिसाच्या रकमेबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की त्याला जिंकलेल्या रकमेतून अर्धेसुद्धा पैसे मिळाले नव्हते. ‘बिग बॉस मराठी 2’च्या विजेत्याला 25 लाख रुपये मिळाले अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी ट्विस्ट आणला. त्यामुळे फिनालेच्या काही तास आधी बक्षिसाची रक्कम आठ लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती. यानंतर कॅश प्राइज 17 लाख रुपयांवर येऊन पोहोचलं होतं. शिव ठाकरेने पुढे सांगितलं की त्या 17 लाख रुपयांमधूनही त्याला फक्त 11.5 लाख रुपयेच मिळाले होते. यातूनही काही पैसे कापले गेले होते. यामध्ये त्याच्या कुटुंबीयांच्या विमानप्रवासाची तिकिटं आणि काही कपड्यांचा बिल समाविष्ट होता.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस’मुळे पालटलं नशीब

‘बिग बॉस मराठी 2’ जिंकल्यानंतर शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र तो हा शो जिंकू शकला नाही. यामध्ये तो रनरअप ठरला होता. मात्र बिग बॉसच्या शोनंतर आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं शिव या पॉडकास्टमध्ये म्हणाला. शोमुळे शिव ठाकरेची चांगली कमाई होऊ लागली होती आणि एकानंतर एक सलग त्याला तीन रिॲलिटी शोजचे ऑफर्स मिळाले होते. बिग बॉसमध्ये येण्याआधी तो ‘रोडिज’ या शोमध्ये सहभागी झाला होता. नुकताच त्याने ‘झलक दिखला जा 11’मध्येही भाग घेतला होता.