Shraddha Kapoor : प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी असूनही बॉलिवूडमध्ये खाल्ली ठेच, दोन फ्लॉपनंतर असा बदलला नशिबाचा खेळ; आज…
Bollywood Actress : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या करिअरबद्दल आणि नेटवर्थबद्दल जाणून घेऊया.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'बागी', 'छिछोरे' आणि 'स्त्री 2' यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, श्रद्धासाठी बॉलिवूडमधील हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला तिचे लागोपाठ दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. अभिनयासाठी तिने शिक्षणही अर्धवट सोडलं. मात्र, एका महत्त्वाच्या निर्णयामुळे तिचं नशीब बदललं आणि ती लोकप्रिय अभिनेत्री बनली.
श्रद्धा कपूर ही ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर आणि अभिनेत्री शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी आहे. प्रसिद्ध कुटुंबातून आलेली असूनही तिला चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. श्रद्धानं मुंबईतील शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात मानसशास्त्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे तिनं शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत परतली. त्यानंतर तिनं चित्रपटांसाठी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली.
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तीन पत्ती' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आर. माधवन यांसारखे कलाकार होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. त्यानंतर २०११ मध्ये आलेला 'लव्ह का द एंड' हा चित्रपटही अपेक्षित यश मिळवू शकला नाही. सलग दोन चित्रपट अपयशी ठरल्यामुळे श्रद्धाच्या करिअरसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं.
श्रद्धाच्या करिअरला खरी दिशा मिळाली ती दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या 'आशिकी 2' या चित्रपटामुळे. या चित्रपटाची ऑफर मिळण्यापूर्वी श्रद्धाने यशराज फिल्म्ससोबत करार केला होता. मात्र, 'आशिकी 2'मध्ये काम करण्यासाठी तिनं 'औरंगजेब' हा चित्रपट नाकारला आणि यशराज फिल्म्ससोबतचा करारही संपवला. तिचा हा निर्णय करिअरसाठी महत्त्वाचा ठरला.
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिकी 2'ने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. आदित्य रॉय कपूरसोबत तिची जोडी प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटातील आरोहीच्या भूमिकेमुळे श्रद्धा रातोरात लोकप्रिय झाली. त्यानंतर 'एक व्हिलन', 'हैदर', 'एबीसीडी २', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'छिछोरे' आणि 'स्त्री' यांसारख्या चित्रपटांमधून तिनं प्रसिद्धी मिळवली.
श्रद्धा कपूर आता मराठी लोककलेतील ज्येष्ठ तमाशा आणि लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 'ईठा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात श्रद्धा विठाबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने विशेष मेहनत घेतली आहे.
श्रद्धा कपूर केवळ अभिनयातूनच नव्हे, तर जाहिराती आणि व्यवसायातूनही कोट्यवधींची कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती अंदाजे 130 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. ती एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी रुपये मानधन घेते.