Shruti Haasan : देव ही संकल्पना आमच्यासाठी अस्तित्वात नाही, आम्ही चेटकिणींच्या नाती…प्रसिद्ध अभिनेत्रीनं धर्माबद्दल केलेलं वक्तव्य
Actress On Religion : प्रसिद्ध अभिनेत्रीनं एका जुन्या मुलाखतीत धर्माबद्दल वक्तव्य केलेलं. आमच्यासाठी देव ही संकल्पना अस्तित्वात नाही, असं अभिनेत्री म्हणाली.

कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासननं हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. एका मुलाखतीत श्रुतीनं तिच्या नास्तिक कुटुंबाबद्दल उघडपणे सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणालेली की, तिच्या घरात देवाला स्थान नाही. तिच्या वडिलांनाही धर्मावर चर्चा करणं आवडत नाही.
श्रुती हासनच्या आईला भीती वाटत होती
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत श्रुती हासननं सांगितलेलं की, ती तमिळ आणि हिंदीच्या वातावरणात वाढली. तिच्या आई-वडिलांचा वारसा पुढे नेण्याच्या दबावाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘माझं संगोपन अशा प्रकारे झालं असल्यामुळे, माझ्यावर माझ्या आईचा प्रभाव अधिक होता. त्यामुळे, आम्ही फक्त तमिळमध्ये बोलत असल्यामुळे मी हिंदी शिकू शकणार नाही, अशी माझ्या आईला काळजी वाटत होती. याचा माझ्या तमिळ भाषेवर अनेक वर्षे नकारात्मक परिणाम झाला. माझे आई-वडील कधीच शाळेत गेले नाहीत, त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना कसं शिक्षण द्यावं हे माहित नव्हतं.’
श्रुती पुढे म्हणाली की, ‘माझे बालपण सामान्य नव्हतं. आम्ही चित्रपटाच्या सेटवर वाढलो. मी पाच वर्षांची असताना, मला हत्ती आणि कुत्रे आमच्या जवळ येताना दिसायचे. हे सर्व कमाल होतं. मी अनेक प्रसिद्ध कलाकारांना भेटले आणि अनेक अद्भुत ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली.’
‘आम्ही एका नास्तिक, धर्मनिरपेक्ष कुटुंबात वाढलो. मी असं म्हटल्यावर माझ्या वडिलांना ते आवडत नाही. आमच्या घरी कोणतेही देव नव्हते, तसंच मंगळवारी मांसाहार टाळणं बंधनकारक नव्हतं. घरी असं काही घडलं नाही. धर्म आणि देव ही संकल्पना आमच्यासाठी अस्तित्वात नाही. म्हणूनच, लहानपणापासूनच माझ्या मनात हे बिंबवलं गेलं की, कला हीच देवता आहे. आमच्या पूर्वज स्त्रिया होत्या. म्हणूनच माझा विक्का (निसर्ग देवतांची पूजा) आणि मूर्तिपूजेवर विश्वास आहे. आम्ही अशा चेटकिणींच्या नाती आहोत ज्यांना जाळता येत नव्हतं. मला वाटतं की, त्यांचं रक्त माझ्या नसांमध्ये वाहतंय.’ असं श्रुती हासन शेवटी म्हणालेली.