
प्रेक्षकांचं रक्त खवळण्यास भाग पाडणाऱ्या, रोमांचक दृश्यांनी भरलेल्या आणि काहीही करून प्रेक्षकांच्या खिशातून तिकिटाचे पैसे काढून घेणाऱ्या चित्रपटांच्या शर्यतीत आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ अत्यंत वेगळा ठरतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतं. काही चित्रपटांच्या बाबतीत फार डोकं लावण्याची गरज नसते. त्यातील कथा तुम्हाला इतकी गुंतवून ठेवते, की तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जाता. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने काही काळ ब्रेक घेतल्यानंतर ‘सितारे जमीन पर’मधून कमबॅक केलं आहे. त्याच्या या कमबॅकची प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. आमिरने पुन्हा एकदा नेहमीपेक्षा वेगळा विषयी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊयात..
अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेल्या ‘विशेष’ लोकांना चांगली वागणूक दिली जात नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या व्यक्तीप्रती संवेदनशीलता बाळगायला काहीजण विसरतात. आजच्या काळातली ही अशीच एक दुर्मिळ गोष्ट आहे. ही कथा एका अशा प्रशिक्षकाची आहे, ज्याला आयुष्यात कधीही भीतीचा सामना करावा लागला नाही. कारण जेव्हा जेव्हा तो आयुष्याच्या चक्रात अडकतो, तेव्हा तो त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याऐवजी थेट पळून जाणं निवडतो. वडिलांकडून मिळालेला ट्रॉमा, आपल्या पत्नीच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझं यांच्यात अडकलेला गुलशन अरोरा (आमिर खान) जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत सर्व गोष्टी चालवून घेतो आणि जेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात, तेव्हा तो थेट माघार घेतो. दिल्लीच्या बास्केटबॉल टीमचा असिस्टंट कोच गुलशन अरोरा हा प्रशिक्षक म्हणून खूप चांगला असला तरी माणूस म्हणून तो कमकुवत आहे.
माणूस कितीही पळवाट काढणारा असला तरी एकदा तो कायद्याच्या कचाट्यात अडकला की कोर्टाकडून त्याची लगाम आपोआप खेचली जाते. अशाच एका घटनेत गुलशन अपराधी ठरतो. परंतु पहिल्यांदाच गुन्हा घडल्याने त्याला तुरुंगात न पाठवता ‘विशेष’ लोकांच्या टीमला बास्केटबॉलचं प्रशिक्षण देण्याचा आदेश देते. गुलशनला ऑटिज्म, डाऊन सिंड्रोम किंवा ऑटिज्म स्पेक्ट्रम यांविषयी माहिती असते. परंतु अशा विकारांनी जन्मलेल्या लोकांना तो ‘नॉर्मल’ किंवा सर्वसामान्य व्यक्ती मानत नाही. तो दुसऱ्यांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणूनच पत्नी सुनीतासोबतही (जिनिलिया डिसूझा) त्याचे वाद सुरू आहेत. नव्या बास्केटबॉल टीमला प्रशिक्षण देताना गुलशनमध्ये जे बदल घडतात, त्याचीच कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
एक कलाकार म्हणून आमिर खानचं भावनिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांकडे नेहमीच झुकतं माप असल्याचं पहायला मिळतं. हा चित्रपट ऑटिज्म स्पेक्ट्रम किंवा डाऊन सिंड्रोमबद्दल ज्ञान देण्याचा प्रयत्न करत नाही. तर तुमच्यापेक्षा वेगळा असलेल्या व्यक्तीशी कसा व्यवहार करायचा, हे तो शिकवतो. या चित्रपटात केवळ भावना आणि नाट्यच नाही. तर त्यामधील विनोद हा अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या अनेक विनोदी चित्रपटांपेक्षाही खूप चांगला आहे. त्यातील संवादही दमदार आहेत. यात संदेश किंवा नाट्याचा डोस अधिक नसावा याबद्दल आमिरने सावधगिरी बाळगल्याचं दिसून येतं. जेव्हा कधी असा प्रसंग येतो किंवा कथा मंदावू लागल्याचं जाणवतं तेव्हा एखाद्या विनोदी दृश्याने वातावरण बदलण्याचा प्रयत्न होतो.
आमिरच्या अभिनयकौशल्यावर कोणीच कधी शंका घेऊ शकत नाही. ‘सितारे जमीन पर’मधील त्याचा अभिनय खास लक्षात राहील असाच आहे. या चित्रपटात आमिरसोबत दिसणारे इतर कलाकार हे चित्रपटात काम करणारे कलाकार नाहीत. तर ते वास्तविक जीवनातील ‘विशेष’ लोक आहेत, ज्यांना देशभरातून निवडलं गेलंय. आरुष दत्ता, गोपी कृष्णन, वेदांत शर्मा, नमन मिश्रा, ऋषी सहानी, ऋषभ जैन, आशिष पेंडसे, संवित देसाई, सिमरन मंगेशकर आणि आयुष भंसाली यांनी ज्या पद्धतीने भूमिका साकारल्या आहेत, ते खरंच प्रशंसनीय आहे. याशिवाय डॉली अहलुवालिया आणि ब्रिजेंद्र काला यांसारख्या कलाकारांनीही मनं जिंकली आहेत.
‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या काही कमकुवत बाजूसुद्धा आहेत. काही ठिकाणी या चित्रपटाच्या कथेचा वेग मंदावतो. तर काही ठिकाणी मूळ कथेपासून भरकटल्यासारखं वाटतं. गुलशनच्या आईच्या कथेतील ट्विस्ट आणि इतर काही छोट्या-मोठ्या गोष्टी यात दाखवल्या नसल्या तरी चाललं असतं, असं जाणवतं. परंतु जिथे या चित्रपटाची कमकुवत बाजू समोर येऊ लागते, तिथे आमिर त्याच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात विशेष मुलांची भूमिका साकारणारे कलाकार जेव्हा पडद्यावर येतात, तेव्हा तुमची नजर त्यांच्यावर खिळून राहते. त्यामुळे एकप्रकारे ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटातील कमकुवत वाटणाऱ्या गोष्टीच काही ठिकाणी जमेच्या बाजू ठरल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.