
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा लंडनमधील विवाहसोहळा प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन भागात दाखवण्यात येत आहे. रक्षाबंधननिमित्त सोनालीने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो पोस्ट करत एक किस्सा सांगितला.

'माझा भाऊ लग्नाला येऊ शकत नव्हता. पण माझंही ठरलं होतं मंडपात तोच मला घेऊन जाणार. कसं घडवून आणलं हे आणि कशामुळे अडकला होता तो, ते बघाच,' असं कॅप्शन देत तिने हे खास फोटो पोस्ट केले आहेत.

अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचं लग्न कसं झालं, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती.

आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता आलं. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 ऑगस्ट रोजी प्लॅनेट मराठीवर सोनालीचा हा विवाहसोहळा पहायला मिळाला.

सनई चौघडे… फुलांच्या रंगीबेरंगी माळा… लग्नमंडप… जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा… पाहुण्यांची लगबग… जेवणात मराठमोळा बेत… असा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा लंडनमध्ये रंगला होता.