ऑस्करच्या शर्यतीत RRR; ‘या’ 14 कॅटेगरीमध्ये नोंदवलं नाव

RRR साठी ऑस्करची आशा कायम; निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

ऑस्करच्या शर्यतीत RRR; या 14 कॅटेगरीमध्ये नोंदवलं नाव
RRR
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2022 | 5:12 PM

मुंबई- RRR हा चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण (Ram Charan) यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून या चित्रपटाला पाठवलं जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र परदेशी भाषांच्या विभागात भारताकडून ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवलं गेलं. असं असलं तरी RRR हा चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी निवडला जाण्याची शक्यता अजूनही आहे. कारण आता निर्मात्यांनी या चित्रपटाचं नाव ऑस्करच्या एक नव्हे तर 14 विविध विभागांसाठी नोंदवलं आहे.

भारतासोबतच परदेशातही RRR हा चित्रपट तुफान गाजला. हॉलिवूडच्या नामवंत कलाकारांनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर कौतुक केलं होतं. ऑस्करसाठी भारताकडून RRR ला का पाठवलं नाही, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला गेला. त्यानंतर आता निर्मात्यांनी ऑस्करच्या 14 विभागांसाठी हा चित्रपट पाठवला आहे. ‘FYC’ (फॉर युअर कन्सिडरेशन) या मोहीमेत त्यांनी भाग घेतला आहे.

‘या’ विभागांमध्ये नोंदवलं नाव

सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- एस. एस. राजामौली
सर्वोत्कृष्ट अभिनेता- ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री- अजय देवगण, आलिया भट्ट
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- नाटू नाटू
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर- एम. एम. किरवाणी

याशिवाय सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन, सर्वोत्कृष्ट साऊंड, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग या विभागांसाठीही RRR चं नाव नोंदवलं गेलंय.

अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावर आधारित काल्पनिक कथेवर हा चित्रपट आधारित आहे. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरणसोबतच चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट, श्रिया सरन, अॅलिसन डुडी, ओलिव्हिया मॉरिस आणि रेय स्टिव्हन्सन यांच्याही भूमिका आहेत.