‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील राजमाला प्रेक्षकांची पसंती; कोण आहे अभिनेत्री?

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकलं आहे. गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळत आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतंमधील राजमाला प्रेक्षकांची पसंती; कोण आहे अभिनेत्री?
Mrunmayee Gondhalekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 13, 2023 | 11:37 AM

मुंबई : 13 डिसेंबर 2023 | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं नवं पर्व सुरु झालं आहे. मालिकेचं कथानक आता 25 वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतला आहे. पुनर्जन्माचा हा प्रवास उत्कंठावर्धक आहेच. पण त्यासोबतच मालिकेतली अनेक नवी पात्रं प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजमा बोलू शकत नाही. लहान असताना तिला मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यात तिची वाचा गेली. राजमाचा भूतकाळ नेमका काय आहे? नित्या आणि जयदीपसोबत राजमाचं काय नातं आहे? याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.

मालिकेत राजमाची भूमिका अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर साकारतेय. मृण्मयी मुळची पुण्याची आहे. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. हीच आवड जोपासत तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. नृत्याची आवड आणि अभिनयाच्या वेडापायी तिने मुंबई गाठली. मृण्मयीने अनेक रिॲलिटी शोजमध्ये सहभाग घेतला आहे आणि ती विजेतीही ठरली आहे. अनेक मालिकांमध्येही मृण्मयीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

मृण्मयीची स्टार प्रवाह वाहिनीसोबतची ही पहिली मालिका आहे. इतक्या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशा शब्दात तिने आपली भावना व्यक्त केली. “राजमा बोलू शकत नाही. न बोलता भावना व्यक्त करणं आव्हानात्मक आहे. अशा पद्धतीचं पात्र मी याआधी साकारलेलं नाही. त्यामुळे राजमा साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत,” असं मृण्मयी म्हणाली. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची एण्ट्री झाली. हर्षदा मालिकेत सरपंचाची भूमिका साकारत आहेत. सौ. वसुंधरादेवी अहिरराव असं त्यांच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि हटके अशी ही भूमिका आहे.