‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मोठा ट्विस्ट; व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल

साधीभोळी गौरी आता शालिनीच्या अवतारात दिसणार आहे तर चलाख शालिनी ही बिचाऱ्या गौरीच्या अवतारात दिसणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना कसा वाटणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मोठा ट्विस्ट; व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मोठा ट्विस्ट
Image Credit source: Tv9
| Updated on: Feb 03, 2023 | 7:58 PM

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कथेच्या गरजेनुसार नवनव्या पात्रांची एण्ट्री होत असते. मात्र असं क्वचितच घडलं असेल जेव्हा एखाद्या मालिकेतील व्यक्तिरेखांचीच अदलाबदल झाली असेल. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत व्यक्तिरेखांची अदलाबदल झाली आहे. साधीभोळी गौरी आता शालिनीच्या अवतारात दिसणार आहे तर चलाख शालिनी ही बिचाऱ्या गौरीच्या अवतारात दिसणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना कसा वाटणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मालिकेतील या व्यक्तिरेखांची बदल चिमुकल्या लक्ष्मीच्या सांगण्यावरून झाला आहे. राजहट्ट आणि बालहट्ट यांपुढे सर्वांनाच झुकावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे लक्ष्मीच्या इच्छेखातर आता शिर्केपाटील कुटुंबात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जयदीपच्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीचा बराच छळ केला. गौरी ही घराची मालकीण असूनही शालिनीने तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली. मात्र जयदीप आता जयवंत देशमुख बनून परत आला आहे.

शालिनीला धडा शिकवण्यासाठी त्याने आणि लक्ष्मीने मिळून हा नवीन अदलाबदलीचा डाव आखला आहे. म्हणूनच गौरी ही शालिनी झाली आहे तर शालिनी ही आता गौरी झाली आहे. गौरीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा अशी प्रेक्षकांची इच्छा होती. त्यामुळेच कथेत हा खास बदल करण्यात आला आहे.

मालिकेच्या पुढील एपिसोड्समध्ये शालिनीला गौरी कशी अद्दल घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू ही गौरी, मंदार जाधव हा जयदीप आणि माधवी निमकर ही शालिनीच्या भूमिकेत आहे.