करिश्मा कपूरच्या पूर्व पतीने निधनापूर्वीच केला होता पुढील 10 वर्षांचा प्लॅन; पत्नी-मुलांसाठी ठरवल्या होत्या या गोष्टी

करिश्मा कपूरच्या पूर्व पतीने निधनाच्या काही महिन्यांपूर्वीच पुढील 10 वर्षांचा प्लॅन लिहून काढला होता. यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता, याचा खुलासा त्याने एका पॉडकास्टमध्ये केला होता. संजय कपूरचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं.

करिश्मा कपूरच्या पूर्व पतीने निधनापूर्वीच केला होता पुढील 10 वर्षांचा प्लॅन; पत्नी-मुलांसाठी ठरवल्या होत्या या गोष्टी
करिश्मा कपूर, संजय कपूर
| Updated on: Jun 26, 2025 | 11:22 AM

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं नुकतंच निधन झालं. निधनापूर्वी संजयने त्याच्या भविष्यातील 10 वर्षांसाठी प्लॅनिंग केली होती. इतकंच नव्हे तर त्याच्या निधनानंतर त्याची चारही मुलं कोणत्या तत्त्वांच्या आधारावर आयुष्य जगावं असं त्याला वाटतं, याविषयीही तो व्यक्त झाला होता. संजयने करिश्मा कपूरशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना समारा आणि कियान ही दोन मुलं आहेत. निधनाच्या तीन महिन्यांपूर्वी संजयने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या 10 वर्षांच्या ‘फ्युचर प्लॅनिंग’चा खुलासा केला होता.

इंडियन सिलिकॉन व्हॅली पॉडकास्टमध्ये संजय म्हणाला, “माझ्यासाठी विश्वास आणि आदर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कुटुंबाने एकत्र येणं आणि एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. मी आणि माझी पत्नी पालकत्वावर प्रशिक्षण सत्र करतो. आम्हाला चांगले पालक बनायचं आहे. आम्ही आठवड्यातून एकदा भगवदगीतेवरही प्रशिक्षण सत्र करतो. मला माझ्या मुलांना आणि माझ्या कुटुंबाला विश्वासाभोवती, आदराभोवती, एकतेभोवती, एकत्र राहण्याभोवती फिरणारी काही मूल्ये हवी आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.”

याविषयी संजय पुढे म्हणाला, “आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. आम्ही एका मिश्र कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे ते नेहमीच सोपं नसतं. पण आम्ही खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे अशी व्यवस्था आहे, जिथे आपण सर्वजण एकत्र काम करतो, जिथे आपण एकमेकांवर प्रेम करतो. माझ्या आणि माझ्या पत्नीनंतरही कुटुंबात ही व्यवस्था चालू राहावी असं मला वाटतं.”

कंपनीतील सक्रिय कार्यकारी भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर पुढील जीवन कसं जगणार आहेस, असा प्रश्न संजयला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्याने आपली प्लॅनिंग सांगितली. “मी खूप चांगला प्लॅनर आहे. ऑक्टोबर महिन्यात मी माझ्यासाठी केलेला पुढील दहा वर्षांचा प्लॅन लिहून काढला होता. यात ध्येयांचा समावेश नव्हता. तर मी ज्या गोष्टींवर माझं लक्ष केंद्रीत करेन, त्यांचा समावेश होता. मग ते कामाच्या बाबतीत असो किंवा इतर बाबतीत. कामाव्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी मला करायच्या आहेत, ज्याबद्दल मी बांधिल आहे. मी पुढे काय करेन आणि काय करणार नाही याविषयी खूप स्पष्ट आहे. माझ्यासाठी स्पोर्ट्स खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य आणि फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. मी पोलो खेळतो, माझी एक टीम आहे. मला जितकं सातत्याने खेळता येईल मी खेळतो”, असं त्याने स्पष्ट केलं.

संजयचं निधन पोलो खेळतानाच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने झालं. पोलो खेळताना अचानक त्याच्या तोंडात मधमाशी गेली आणि घशात चावा घेतल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली, असं म्हटलं गेलं. “मी माझ्या कुटुंबीयांना कसा वेळ देतो, हेदेखील माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जेव्हा मी 10 वर्षांचा प्लॅन लिहित होतो, तेव्हा मी प्रत्यक्ष कामाशी संबंधित, कामाशी संबंधित नसलेल्या गोष्टी, पायाभूत गोष्टींविषयी विस्तृत विचार केला होता. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी व्यस्त वेळापत्रकाशिवाय शांत बसू शकते. स्वत:च्या वेळेचा मास्टर असणं ही एक उत्तम गोष्ट आहे”, असं संजयने म्हटलं होतं.