Suraj Chavan: साऊथ कोरियात गुलिगत सूरज चव्हाणची हवा! नरेंद्र मोदी, राहुल गांधींपेक्षाही जास्त चर्चा

Suraj Chavan: कोरियन आयडॉल्स आणि सेलिब्रिटींची जगभरात क्रेझ आहे, पण साऊथ कोरियात मात्र 'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाणची क्रेझ पहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

Suraj Chavan: साऊथ कोरियात गुलिगत सूरज चव्हाणची हवा! नरेंद्र मोदी, राहुल गांधींपेक्षाही जास्त चर्चा
दक्षिण कोरियातही सूरज चव्हाणची हवा
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 9:15 AM

Suraj Chavan: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या हटके स्टाइलमुळे आणि ‘गुलिगत’ अंदाजामुळे चर्चेत असणारा सूरज आता थेट दक्षिण कोरियातही प्रसिद्ध झाल्याचा दावा एका इन्फ्लुएन्सरने केला आहे. यासंदर्भातील एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये एका कोरियन तरुणाने सूरजला ओळखताच त्याला ‘इंडियन जस्टिन बीबर’ असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून सूरजचे चाहतेही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ पोस्ट करत दक्षिण कोरियामध्ये सूरज चव्हाण प्रचंड प्रसिद्ध असल्याचा दावा केला आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला तो म्हणतो की, दक्षिण कोरियात सूरजला ‘इंडियन जस्टिन बीबर’ म्हणून ओळखलं जातं. सूरज जर कोरियाच्या विमानतळावर आला, तर तिथले लोक त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी करतील. एवढंच नाही, तर इमिग्रेशन अधिकारीसुद्धा त्याच्यासोबत सेल्फी घेतील, असं तो मजेशीरपणे सांगतो. यानंतर तो आपल्या कोरियन मित्राची छोटीशी चाचणी घेतो. सर्वप्रथम त्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवून ओळखतो का, असं विचारतो. त्यावर तो भारताचे पंतप्रधान असल्याचं सांगतो. त्यानंतर राहुल गांधी यांचा फोटो दाखवल्यावर मात्र तो त्यांना ओळखत नसल्याचं सांगतो. पण जेव्हा सूरज चव्हाणचा फोटो दाखवला जातो, तेव्हा तो लगेच हसू लागतो आणि ‘इंडियन जस्टिन बीबर’ असं म्हणतो.

Loading...

पहा व्हिडीओ-

‘गुलिगत’, ‘झापुक झुपूक’ची जादू कोरियातही

सूरजची लोकप्रियता त्याच्या हटके बोलण्याच्या शैलीमुळे आणि सोशल मीडियावरील व्हिडीओंमुळे वाढली आहे. ‘गुलिगत’ आणि ‘झापुक झुपूक’ हे त्याचे शब्दही प्रचंड लोकप्रिय झाले. त्याच्या याच मजेशीर व्हिडीओंमुळे त्याला मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. कोरियन तरुणाला सूरज एवढा लोकप्रिय का आहे, असं विचारल्यावर तो सूरज खूप मजेशीर व्हिडीओ बनवतो, असं सांगतो.

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सची चर्चा

हा व्हिडीओ व्हायरल होताच सूरजच्या चाहत्यांनी त्याला कमेंटमध्ये टॅग करण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने, ‘आपला सूरज चव्हाण, मराठी माणसाचा नादच खुळा’, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, ‘सूरजने तोंड उघडलं तर उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये शांती करार होईल’, अशी मजेशीर कमेंट केली. आणखी एका नेटकऱ्याने, ‘काही म्हणा सूरजचं नशीब आहे… पब्लिसिटी त्याची पाठ सोडत नाही. आता कोरियामध्ये फेमस’, असं म्हटलं आहे. त्यामुळे सूरजच्या या कथित आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us