त्या दिवसांमधील प्रेम, एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण…नाना पाटेकर यांच्या आठवणीत प्रसिद्ध अभिनेत्री भावुक

Actress On Nana Patekar : अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी यांनी नाना पाटेकरांसोबतचे जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

त्या दिवसांमधील प्रेम, एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण...नाना पाटेकर यांच्या आठवणीत प्रसिद्ध अभिनेत्री भावुक
| Updated on: Oct 30, 2026 | 3:12 PM

अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी यांनी नाना पाटेकर यांची आठवण काढत भावुक पोस्ट शेअर केली आहे. दीप्ती नवल यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही जुने फोटो त्यांनी शेअर केले आहेत. सुश्मिता मुखर्जी यांनी पोस्ट करत लिहिलं की, ‘आम्ही चौघंच होतो. वाईन, म्युजिक, हसणं आणि अगदी पियानोसुद्धा! आमचं एक छोटंसं जग होतं, आयुष्यात पुढे येणाऱ्या गुंतागुंतींपासून पूर्णपणे दूर असलेलं. पण नंतर आमच्यापैकी एक जण कायमचा निघून गेला. आम्हाला फक्त त्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख नाहीये, तर एकेकाळी असलेल्या त्या सुंदर क्षणांचाही विरह जाणवला. एकत्र घालवलेला वेळ, निरागसता आणि पुन्हा कधीच अनुभवता न येणारा तो काळ.’

सुश्मिता मुखर्जी यांची पोस्ट

Loading...

‘त्या आठवणी धूसर झाल्या होत्या. काळाच्या ओघात अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या होत्या. पण जेव्हा मी ते फोटो पाहिले, तेव्हा काहीतरी जादू घडली. त्या फोटोंमुळे मनाच्या एका कोपऱ्यात शांतपणे जपून ठेवलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अचानक ते सगळे क्षण डोळ्यांसमोर उभे राहिले. कदाचित प्रत्येक गोष्ट आठवली नाही, पण त्या दिवसांमधील प्रेम, मैत्री, एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आणि त्या काळातील निरागसता मात्र पुन्हा अनुभवता आली. जे दिवस पुन्हा कधीच परत येणार नाहीत, त्यांच्या आठवणींनी मन भरून आलं. हे फोटो माझी मैत्रीण दीप्ती नवल हिच्या ३ फेब्रुवारी १९९१ रोजी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहेत.’

‘आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट हळूहळू समजते, ती म्हणजे आयुष्य कधीच एकसारखं राहत नाही. ते अनपेक्षित वळणं घेत सतत पुढे जात असतं. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही निघून जातात, आठवणी धूसर होतात आणि अशातच कधीतरी एखादा जुना फोटो पुन्हा सगळ्या आठवणी ताज्या करतो. या सगळ्यात आपण मात्र पुढे जात राहतो. एकमेकांची साथ देत, आयुष्यातील अनोळखी वळणांचा स्वीकार करत आणि आयुष्य नावाच्या या सुंदर, पण तितक्याच हळव्या प्रवासातील प्रत्येक क्षण जपून ठेवतो.’ असं सुश्मिता यांनी शेवटी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us